किरीट सोमय्या पुन्हा मैदानात, उद्धव ठाकरे यांच्यावर केला भ्रष्टाचाराचा मोठा आरोप



भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या पुन्हा एकदा मैदानात परतले आहेत. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे राजकीय दृष्ट्या ते अडचणीत सापडले होते. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. किरीट सोमय्या भ्रष्टाचाराची प्रकरण, आर्थिक घोटाळे खणून काढण्यासाठी ओळखले जातात. आता किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे व महाराष्ट्र सरकारने रिचार्डसन क्रूडास या भारत सरकारच्या कंपनीकडून मुलुंड येथील जागा ताब्यात घेतली. सिडकोला तात्पुरते हॉस्पिटल बांधून देण्याचे आदेश दिले. सिडकोने ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला 1850 खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचे आदेश दिले. ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनी एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी होती.

7 जुलै 2020 ते 31 जुलै 2022 असे 25 महिने हॉस्पिटल चालू ठेवण्यात आले. त्यासाठी भाड्यापोटी ओक्स मॅनेजमेंट कॅन्सल्टन्सी कंपनीला 90 कोटी रुपये देण्यात आले. बांधकामासाठी 10 कोटी रुपये दिले असे मिळून 100 कोटींचा घोटाळा उद्धव ठाकरे यांनी केला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. रिचार्ड्सन कृडास कंपनी कडून भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीचा एकही पैसा देण्यात आला नाही असा सुद्धा आरोप आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस, आयकर विभाग, ईडी कार्यालय यांना तक्रार दिली असल्याचे सांगितले. या कोविड सेंटर प्रमाणे मुंबई मधील 15 कोविड सेंटरसाठी 700 कोटी रुपये भाडे घोटाळे करण्यात आले आहेत असा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे.

Post a Comment

0 Comments