मुंबई |
राज्यातील सरकार सैरभैर झाले असून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा भाजपचा डाव असल्याचा खळबळजनक दावा विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. म्हणूनच शिंदे आजारी असल्याचा बनाव करण्यात येत आहे. असेही वडेट्टीवार म्हणाले. ते गडचिरोली येथे आयोजित पत्रकारपरिषदेत बोलत होते.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर वडेट्टीवार पहिल्यांदाच गडचिरोली येथे आले होते. रविवारी सत्कारानंतर वडेट्टीवार यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारपरिषद आयोजित केली होती. ते म्हणाले, मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात येत आहे.परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून याचे खंडन करण्यात आले होते. आज पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकृती बरी नसल्याचे सांगण्यात आले आहे.
हा सर्व प्रकार भाजपचा डाव असून शिंदेंना आजारी करून अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहे. काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यात याच पार्श्वभूमीवर भेट झाली, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. यावेळी अजित पवार भेटीबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केल्यास लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.
0 Comments