अमृता फडणवीसांच्या ट्विटवर आक्षेपार्ह कमेंट करणं 'सीए'ला चांगलचं पडलं महागातमुंबई |

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गेल्या काही दिवसांत ट्रोल करण्याचे प्रमाण वाढलं आहे. दरम्यान अमृता फडणवीस यांच्याबद्दल एका ट्विटवर आक्षेपार्ह कमेंट करणं छत्रपती संभाजीनगरमधील 'सीए'ला चांगलंच महागात पडलं आहे. ट्विटवरती अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे लक्षात येताच शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी देखील तत्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. अतिष ओमप्रकाश काबरा (वय 35, रा. नरहरी वसंत विहार, न्यु एसबीएएच कॉलनी, ज्योतीनगर) असं आरोपीचं नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून रोजी अमृता फडणवीस यांच्या ट्विटर पोस्टवर एका सीए असलेल्या अतिष नावाच्या व्यक्तीने आक्षेपार्ह कमेंट केली होती. हा प्रकार शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आला. पदाधिकाऱ्यांनी याची माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांना दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांना कळवण्यात आले.

सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रविणा यादव यांनी आरोपी अतिषच्या प्रोफाईलवरुन त्याचा शोध घेतला. तसेच त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं. तसेच भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर यांच्या फिर्यादीवरुन अतिषवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments