मोहोळ तहसील आवारात डबक्यात बसून तरुणाने निषेध नोंदवत केली घाण पाण्याने अंघोळ

 
मोहोळ |

तहसीलदार, पोलीस अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी हे शासकीय वाहनांमध्ये बसून वाट काढत डबक्यातूनच कार्यालयात जात आहेत. शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची मात्र ससेहोलपट होत आहे. नागरिकांना मात्र डबक्यातून तारेवरची कसरत करत वाट काढावी लागत आहे. शासकीय कार्यालयाच्या आवारात साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही किंवा साचलेलं पाणी जाण्यासाठी प्रशासन काहीही उपाययोजना करत नाही. याचा निषेध करण्यासाठी मोहोळ तहसील आवारात नागेश बिराजदार या तरुणाने बादली आणि मग आणून घाण पाण्याने डबक्यात बसून आंघोळ केली. यामुळे मोहोळ तहसीलदार कार्यालयात बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

 मोहोळ तालुक्यातील तहसील कार्यालयाचा 104 गावांशी संपर्क आहे. तसेच तहसील आवारात पोलीस ठाणे आहे. मोहोळ तहसील कचेरीच्या व पोलीस ठाण्याच्या आवारात असणाऱ्या सहा ते सात कार्यालयाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. मोहोळ तहसीलच्या आवारात पावसाच्या पाण्याचे तळे साचले आहे. याबाबत प्रशासन कोणतीही कारवाई किंवा उपाययोजना करत नसल्याने वैतागलेल्या नागेश बिराजदार या तरुणाने तहसील कचेरीच्या आवारात साचलेल्या पाण्यात वृक्षारोपण करून चक्क आंघोळ करीत आंदोलन चालू केले आहे. मोहोळ तहसील परिसरात लक्षवेधी आंदोलनामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी झाली होती. सोलापूर जिल्ह्यात अनेक शासकीय कार्यालये आणि मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामध्ये पावसाचे पाणी साचून अनेकदा वाहनांचा अपघात होतो. परिणामी, जखमी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

Post a Comment

0 Comments