झोळी करून गरोदर महिलांना न्यावे लागते रुग्णालयात ; पूल मंजुरीसाठी दिलेले पत्र कागदावरच



ठाणे |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन वर्षापूर्वी लोखंडेवाडी ते धसईला जोडणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यावर पूल मंजूर करण्यासाठी तत्कालिन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र दिले होते. मात्र हा पूल अद्यापही कागदावरच असल्याने लोखंडेवाडीतील विद्यार्थ्यांसह गावकरी आणि रुग्णांचा झोळीतून जीव धोक्यात घालून पावसाळ्याच्या दिवसात प्रवास सुरू असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.

फडवणीस सरकार सत्तेत आल्यानंतर 'निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान' अशी जाहिरातबाजी सरकराने केली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जिल्ह्यातच दुर्गम भागातील अनेक गाव पाड्यात जाण्यासाठी आजही रस्ते आणि पूल नसल्याने आदिवासी बाधंवांची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात अनेक कामे कागदावरच आहेत. अदिवासी वाड्या पाड्यावर अद्यापही मलभूत सोई सुविधापासून गावकरी वंचित असून अनेक अदिवासी वाड्याना अद्यापही रस्ते नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात काही वाड्यांना नदी ओढ्यातील पुराच्या पाण्याच्या प्रवाहातून जा-ये करावी लागते. यामध्ये मुरबाड तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायत हद्दीतील लोखंडेवाडी या आदिवासी पाडयाचा समावेश आहे.

लोखंडेवाडीची अदिवासी लोकवस्ती १५० च्या आसपास आहे. येथील गावकरी, विद्यार्थी, रुग्ण, यांना गावात सुविधा नसल्याने चार किलोमीटर लांब असलेल्या धसई बाजार पेठेत जावे लागते. गेल्या पाच दिवसापासून धुवांधार पाऊस मुरबाड तालुक्यात सुरू असल्याने या भागातील नदी ओढ्याला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. येथील एका गरोदर विवाहितेला बांबूना चादर गुंडाळून झोळी करून पुरातून जीवघेणा प्रवास केला. या गावकऱ्यांनी गरोदर महिलेला घेऊन ४ किमी अंतर पायपीट करत प्रवास करावा लागतो.

Post a Comment

0 Comments