भाग्यकांताने उभारली पर्यावरण रक्षणाची चळवळ ; विविध शाळांमधे पर्यावरणपूरक सीड पेन्सिल चे वाटप



बार्शी |

पर्यावरण रक्षणाचे अनेक हाकारे पिटारे झाले . बऱ्याच लोकांनी त्या दृष्टीने ठोस पावले देखील उचलली परंतु म्हणावा तसा परिणाम मात्र दिसून आला नाही. दिवसेंदिवस वाढणारे तापमान , होणारी जमिनीची धूप, कमी होत चाललेली जैवविविधता , मनुष्यामध्ये वाढत्या आरोग्यविषयक तक्रारी या सगळ्या गोष्टींना कोठेतरी मानवाने पर्यावरणाकडे केलेले दुर्लक्ष कारणीभूत आहे. वाढते शहरीकरण आणि आधुनिकीकरण याचा फटका पर्यावरणालाच बसत आहे ,पर्यायाने मानवाची सध्याची पिढी आणि पुढील कित्येक पिढ्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागतील असे विविध पर्यावरण तज्ञांनी वारंवार बजावून सांगितले आहे. तरीही माणूस या गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसतो.

अनेक कामांसाठी माणूस वृक्षतोड करतो .परंतु एक झाड तोडावं लागलं तर बदल्यात दोन झाडं लावण्याचं भान त्याला रहात नाही . नवीन पेपर , बांधकाम, गृहसजावट ,शैक्षणिक साहित्य निर्मिती इ.अनेक  कारणासाठी वृक्षतोड होते. भाग्यकांता प्रतिष्ठानने पर्यावरण रक्षणासाठी संकल्प केला आणि पर्यावरणपूरक साहित्य वापरासाठी चळवळ उभारली. आज साधी पेन्सिल बनवण्यासाठी कित्येक झाडं तोडली जातात .भाग्यकांता प्रतिष्ठानने शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना इको फ्रेन्डली सीड पेन्सिलचे वाटप करून एक अभिनव उपक्रम राबवला.

इको फ्रेंडली पेन्सिलचा वापर पर्यावरण वाचवण्याचा समृद्ध मार्ग आहे. ही पेन्सिल रद्दी पेपर पासून बनवलेली असल्यामुळे या पेन्सिलमध्ये लाकूड नाही तसेच कोणतेही इतर हानिकारक पॉलिमर नाहीत. या पेन्सिलच्या वापरामुळे पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही.  त्याचबरोबर या पेन्सिलच्या टोकाला विविध झाडांच्या बिया बसवलेल्या असून पेन्सिल संपल्यानंतर ती फेकून न देता मातीमध्ये पेरण्याचे आवाहन प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले. 

फक्त पहिलीच्याच मुलांना अशा पेन्सिलचे वाटप का ? या प्रश्नाचे उत्तर देताना प्रतिष्ठानचे स्वयंसेवक म्हणाले, 
लहान वयामध्येच पर्यावरण विषयक जागृती अधिक प्रभावीपणे केली जाऊ शकते. या वयात रूजवलेलं पर्यावरणाच्या महत्त्वाचं बीजच पुढे जाऊन मोठ्या वृक्षात रूपांतरीत होणार आहे. लहान वयापासूनच पर्यावरण रक्षणाचे धडे देण्याच्या अनुषंगाने लहान मुलांसाठी पेन्सिल वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही पेन्सिल कागदापासून बनवलेली असल्यामुळे या इको फ्रेंडली पेन्सिल पासून लहान मुलांना कोणताही धोका नाही.

अतिशय व्यापक असा दृष्टिकोन समोर ठेवून भाग्यकांता प्रतिष्ठानने शाळेच्या पहिल्याच दिवशी बार्शी शहरातील साधना कन्या प्रशाला , नगरपालिका शाळा नं ५ , सुयश विद्यालय , जिजामाता प्रशाला , महात्मा फुले विद्यालय इ. शाळांमध्ये जाऊन जवळपास १००० विद्यार्थ्यांना इको फ्रेंडली पेन्सिलच्या वाटपातून पर्यावरणपुरक साहित्याचाच वापर करा असा महत्वपूर्ण संदेश दिला आहे.  या पेन्सिल प्रतिष्ठानने महिला उद्योजकांकडून खरेदी केल्या . अशा प्रकारचे लघुउद्योग बार्शी शहरात सुरू व्हावेत अशी सदिच्छा प्रतिष्ठान व्यक्त केली. 
भविष्यातही केवळ अशाच प्रकारच्या पर्यावरणपूरक साहित्य वापरावर भर देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेशही दिला आहे.

`एक पाऊल मोठ्या बदलाच्या दिशेने ..' या अभिनव चळवळीमधे भाग्यकांता प्रतिष्ठानचे कार्यकारी अध्यक्ष सौ सुनिता गाडेकर , सचिव गणेश शिंदे, सहसचिव श्रध्दा धर्माधिकारी, खजिनदार महेश उकिरडे, भाग्यकांता चे संस्थापक मुरलीधर चव्हाण,अमित इंगोले, तसेच सभासद रोहन नलावडे ,विद्या चव्हाण, सौरभ भोइटे, स्वराज लोखंडे, निर्भय चव्हाण इ असून या चळवळीत जास्तीत जास्त नागरीकांनी सामिल होण्यासाठी देखील आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments