सोलापूर |
सद्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सोलापूर जिल्ह्याचे आमदार असलेले सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांचा समावेश होता. या बंडाच्या दौऱ्यामध्येच आमदार शहाजी पाटील यांचे ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओके’ हा डायलॉग मोठा गाजला. शिवसेनेच्या बंडाची एकीकडे चर्चा होत असतानाच आमदार शहाजी पाटील यांच्या या डायलॉगमुळे ते सर्वत्र प्रसिद्धीच्या झोतातच आले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या किंवा त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात आमदार शहाजी पाटील यांची उपस्थिती व भाषणं लक्षवेधी ठरत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळचे असलेले आमदार शहाजी पाटील यांनी फायदा घेत सांगोल्यासाठी सर्वच विभागात मोठा निधीही खेचून आणला आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत परंपरागत शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात असलेली सांगोला विधानसभेची जागा अल्पमतात खेचून आणल्यापासून त्यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली होती. सध्या सुप्रिम कोर्टाच्या राजकीय निकालानंतर पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. या विस्तारामध्ये प्रसिद्धीच्या झोतात असलेले आमदार शहाजी पाटील यांना मंत्रिपद दिले जाईल व सांगोल्याला लाल दिव्याची गाडी पुन्हा मिळेल, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
0 Comments