मुलास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून आई-वडिलांची निर्दोष मुक्तता !


  बार्शी |

सासू-सासर्‍यांच्या त्रासाला कंटाळून आपल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली तसेच  ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी तीन लाख रुपयाची मागणी करीत शारीरिक , आर्थिक व मानसीक त्रास देत असल्याबद्दल सासू-सासऱ्यांच्या विरुद्ध वैराग पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यातून संबंधित सासू-सासर्‍यांना बार्शी येथील अति. सत्र न्यायाधीश जयेंद्र सी.जगदाळे यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले.
                                            
याबाबत सविस्तर माहिती अशी की , बार्शी तालुक्यातील आळजापूर येथील माधुरी आंगद आगरे हिचा विवाह याच गावातील सतीश राजेंद्र उंबरे याचे बरोबर दिनांक ४ डिसेंबर २०१६ रोजी झाला. लग्न झाल्यानंतर काही दिवस सासू शैला राजेंद्र उंबरे व सासरा राजेंद्र माणिक उंबरे यांनी तिला व्यवस्थित  नांदविले परंतु त्यानंतर  ' तुला घरातील कामधंदा येत नाही ,आम्ही ट्रॅक्टर घेतलेला असून त्याचे कर्ज फेडण्यासाठी तीन लाख रुपये माहेरहून घेऊन ये व ही गोष्ट दुसऱ्यांना सांगू नको 'अशाप्रकारे दमदाटी व शिवीगाळ करीत  मारहाण करून जाचहाट केला.

तसेच माझ्या पतीस 'तू बायकोची बाजू का घेतो,  सासू-सासर्‍याकडून ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी तीन लाख रुपये का घेऊन येत नाही' या कारणावरून नेहमी भांडणतंटा करून, शिवीगाळ करून, घालून पाडून बोलून व अपमानास्पद वागणूक दिल्याने त्यास कंटाळून , निराश होऊन शेतातील चिंचेच्या झाडाचे फांदीला फाशी घेऊन माझे पती सतीश राजेंद्र उंबरे यांनी दि ८ ऑगस्ट २०१७  रोजी आत्महत्या केली. यास कारणीभूत सासू शैला उंबरे व सासरे राजेंद्र उंबरे हे  आहेत 'अशा आशयाची फिर्याद माधुरी सतीश उंबरे हिने दिनांक ३० नोव्हेंबर २०१७ रोजी वैराग पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती . त्यावरून आरोपींविरुध्द भा.द.वि.कलम ३०६, ४९८( अ ), ३२३, ५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करणेत आला होता .
 सदर केसच्या सुनावणी दरम्यान आरोपींच्या वतीने अॅड . संतोष दिगंबर कुलकर्णी (बार्शी ) यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अति सत्र न्यायाधीश जयेंद्र सी. जगदाळे सो .यांनी दि २९ एप्रिल २०२४ रोजी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली .आरोपीच्या वतीने अॅड .संतोष दि . कुलकर्णी व अॅड .सुनील सु . कुलकर्णी यांनी काम पाहिले .

Post a Comment

0 Comments