'who is dhangekar ?' कसब्यातील लोकांनी दिली आमदारकीच्या रूपात चंद्रकांत दादाला दिले उत्तर- ज्येष्ठ पत्रकार संपत मोरे

जेव्हा पुण्यात आलो होतो तेव्हा धंगेकर हे नाव पहिल्या एक दोन आठवड्यात आमच्यापर्यंत पोहोचलं होतं. आम्ही आमच्या भागातील नगरसेवक पाहिले होते, त्यामुळे नगरसेवक म्हटलं की एक चित्र डोळ्यासमोर यायचं, पण पुण्यात रुळत गेल्यावर धंगेकर हे प्रकरण तसं नाहीये, हा माणूस आपल्याकडच्या नगरसेवकासारखा नाही, हा आमदार खासदार आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांना सुद्धा झेपणारा नाही. सामान्य माणसाचे काम कोणी नाही म्हटले की यांच्या डोक्याची शीर उठते आणि थेट भिडतो हा. याच्या कार्यालयात गेलेल्या माणसाला जात धर्म पक्ष वार्ड विचारला जात नाही, असे ऐकण्यात आलं. आणि यांच्या कार्यालयात गेलेला माणूस कधीही रिकामा येत नाही हेही सांगण्यात आले. आमच्या भागातील गलाई व्यवसाय करणारे लोक गावाकड आलं की धंगेकर पुराण सुरु करत.यात माझे  रविवार पेठेतील नातेवाईक सुद्धा असत.धंगेकर यांना ते रविभाऊ म्हणतात. या रवीभाऊसोबत असलेली त्यांची खास ओळख आमचे गाववाले अभिमानाने सांगत. 

दरम्याच्या काळात या रवीभाऊ यांच्याशी माझा संपर्क आला. त्यांच्या बोलण्यातील सहजता, साधेपणा, लोकांशी जवळीक, आणि सामान्य माणसांबद्दल यांना असलेला जिव्हाळा या गोष्टी लक्षात येत गेल्या. माझे मित्र डॉ विक्रम गायकवाड आणि संग्राम गायकवाड यांच्याकडे ते भेटायला आले होते तेव्हा त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. 
"माझ्याकड येणार माणूस खूप अपेक्षेने येतो, त्याला अपेक्षा असते की इथं गेलं की आपलं काम होणार. मग या माणसाच्या चेहऱ्यावर  आनंद निर्माण झाला पाहिजे यासाठी मी काम करतो.आणि जो काम घेऊन येईल तो आपला माणूस समजून मी धडपड करतो. "
"मला लोक पत्र मागायला येतात,आजवर माझ्या ऑफिसमधून  पत्र न्यायला येणारा  एकही माणूस परत गेलेला नाही. अगदी गावच्या सरपंचापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत कोणालाही पत्र मागितले तरी मी पत्र दिले आहे, आपण कोणालाही नाराज केले नाही. "असे ते म्हणाले. 

रविंद्र धंगेकर जेव्हा कसबा विधानसभा निवडणूक लढवत होते, तेव्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यांना उद्देशून 'who is dhangekar ?"असं म्हणाले तेव्हा लोकांनीच या प्रश्नाचे उत्तर द्यायच ठरवले असावे कारण सातत्याने लोकांसाठी काम करणाऱ्या एका सामान्य कुटूंबातील कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण केला जात असेल आणि या कार्यकर्त्याला खचवण्यासाठी जर यंत्रणा राबत असेल तर लोकांनीच धंगेकर कोण याचे उत्तर देण्याचे ठरवले असावे आणि तसे उत्तर दिले. पुण्यात फिरताना चंद्रकांत पाटील यांना टोमणे मारणारे पुणेरी डिजिटल दिसत आहेत. 

आपल्यातील एक कार्यकर्ता जर उभा राहत असेल तर त्याला ताकद देणे त्याच्या पाठीशी बळ उभा करण्याची सामूहिक इच्छा असते, धंगेकर जरी काँग्रेसचे असले तरी त्यांना मिळालेला लोकांचा पाठींबा हा त्यांच्या व्यक्तीगत कामामुळे मिळाला आहे, महाविकास आघाडीची ताकद नक्कीच त्यांना विजयापर्यंत घेऊन गेली, पण त्यांच्या विजयात 50टक्के वाटा त्यांचा स्वतःचा आहे हे खुद्द अजितदादांनी सुद्धा जाहीरपणे सांगितले आहे. 
पुणे जिल्ह्यात खेड लोकसभा मतदारसंघातून किसनराव बाणखेले यांचा विजय ज्याप्रकारे झाला होता तसाच हा विजय आहे.या निवडणुकीनंतर अनेकांना ती निवडणूक आठवत आहे.. 

"हा विजय मी जनतेला अर्पण करतो, असे आमदार रविंद्र भाऊ म्हणतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे..

Post a Comment

0 Comments