बेरोजगारांना नोकरीचे आमीष दाखवून कोट्यवधी रूपये उकळले, महापालिका आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर


कोल्हापूर |

बेरोजगार तरुणांना महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून एक लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला लक्ष्मीपूरी पोलिसांनी शुक्रवारी बेड्या ठोकल्या आहेत. संतोष रंगराव पाटील वय वर्ष ३५ राहणार पांगिरे तालुका भुदरगड असे त्याचे नाव आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या काळात घडला दरम्यान पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता देखील पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

तरुणांना नोकरी देण्याचे आमिष दाखवत महापालिकेच्या लेटरपॅडवर आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून तरुणांना गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. घटना उघडकीस आल्यानंतर महानगरपालिकेत एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या घटनेची दखल घेतली. तपासाधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश दिले आणि तपासाअंती संशयित आरोपी संतोष रंगराव पाटील रा. पांगिरे ता. भुदरगड याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 कोल्हापूर महापालिकेत लिपिक व मुकादम पदासाठी भरती होत आहे. महानगरपालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी माझ्या संपर्कात असल्याने मी तुझे काम करून देतो, असे म्हणत गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील युगंधर मगदुम याला आमिष दाखवले. यानंतर वेळोवेळी ऑनलाइनद्वारे तब्बल एक लाख ७५ हजार १०० रुपये सदर तरुणांकडून उकळत आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर केला. महापालिकेच्या लेटर पॅडवर शिक्का मारून सदर तरुणाला नियुक्तीचे पत्र देण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युगंधर मगदूम यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी त्वरित कारवाई करत संशयित आरोपी संतोष पाटील याला ताब्यात घेतले. आज शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सदर संशयित आरोपी विरोधात या आधीही मुंबई, वसई, विरार आणि कोल्हापुरातील भुदरगड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे ही पोलिसांकडून समोर आले आहे. तर यामागे मोठे रॅकेट असल्याची शंका निर्माण होत आहे. आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments