तरुणांनी राजकारणात यावे!: लोकनियुक्त सरपंचांचे विद्यार्थ्याना आवाहन; विवेकानंद कॉलेजमध्ये सरपंचांची विद्यार्थ्यानी घेतली मुलाखतकोल्हापूर |

दि. २१.०२.२०२३: येथील विवेकानंद कॉलेज येथे चंद्रे (ता. राधानगरी) गावाचे सरपंच श्री. प्रभाकर पाटील आणि फराकटेवाडी (ता. कागल) गावाच्या सरपंच सौ. शीतल फराकटे यांच्या दोन मुलाखतीचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातर्फे आयोजित करण्यात आला. ही मुलाखत बी ए भाग १ च्या दोन विद्यार्थिनी कु. प्रतिद्न्या पालकर आणि कु. श्रेया मांडेकर यांनी घेतली. 'राजकारणाकडे एक भ्रष्ट आणि गुन्हेगारीचे क्षेत्र म्हणून बघितले जाते. पण हे पूर्णत: खरे नाही. राजकारणातून लोकसेवेची, लोकांची आयुष्ये बदलण्याची संधी मिळते.

 आपण सरकारी नोकर होण्यापेक्षा राज्यकर्ते होण्याचे स्वप्न का बघू नये?' असे  फराकटेवाडी  गावाच्या सरपंच सौ. शीतल फराकटेयांनी विद्यार्थ्याना विचारले. 'कुठल्याही परिस्थितीत हार न मानता, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत विद्यार्थ्यानी नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे' असा सल्ला  चंद्रे  गावाचे लोकनियुक्त सरपंच  श्री. प्रभाकर पाटील यांनी विद्यार्थ्याना दिला. गावामधील विकासकामे, निधीचे स्रोत, महिलांचा राजकारणातील सहभाग, महिला सक्षमीकरण इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर या मुलाखतीत प्रकाश टकला गेला. सदस्यांमधून सरपंच विरुद्ध लोकनियुक्त सरपंच यांच्यातील फरक यावरही दोन सरपंचांनी आपली मते मांडली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार यांनी भूषविले. आयक्युएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी, महाविद्यालयातील इतर प्राध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. विविध शाखांच्या ६० हून अधिक विद्यार्थ्यानी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. राज्यशास्त्र विभागाच्या कु. समीक्षा फराकटे,  श्री. दत्ता जाधव, श्री. अजय पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. 

Post a Comment

0 Comments