मित्राचे गुप्तांग कापणाऱ्या तिघांना प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी सुनावली अशी शिक्षा ; दंडही केला लाखात


सोलापूर |

रात्रीच्यावेळी दिशाभूल करून दुसऱ्या गावात आणून आपल्याच मित्राला क्रूरपणे मारहाण करून त्याचे संपूर्ण गुप्तांग कापले आणि खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल तीन आरोपींना सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  डॉ.शब्बीरअहमद औटी यांनी ३० वर्षांपेक्षा कमी नसलेल्या जन्मठेपेसह प्रत्येकी ५० हजार रूपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली. तसेच जखमीला तिघा आरोपींनी प्रत्येकी दहा लाख रूपयांप्रमाणे ३० लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचाही आदेश दिला आहे.

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एखाद्या खटल्यात आरोपींना ३० वर्षांपेक्षा कमी नसलेली जन्मठेप, दंड आणि जखमीला मोठी नुकसान भरपाई अदा करण्याचा आदेश देणारा न्यायालयाचा हा निकाल राज्यातील न्यायालयीन इतिहासात पहिलाच असल्याचा दावा केला जात आहे.

अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या खटल्यात एवढी कठोर शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे  खदीरसाहेब ऊर्फ मुन्ना चाँदसाहेब पटेल (वय ३०), अ.हमीद ऊर्फ जमीर नजीर मुल्ला (वय २६, दोघे रा. मड्डी तडवळगा, ता. इंडी, जि.विजापूर, कर्नाटक) आणि हुसेनी नबीलाल जेऊरे (वय २३, रा. करजगी, ता. अक्कलकोट) अशी आहेत. यातील फिर्यादी जखमीसह सर्व आरोपी रिक्षाचालक आहेत. पटेल, मुल्ला आणि जेऊरे या तिघा आरोपींनी फिर्यादीला रात्री त्याच्या विजापुरातील घरातून जेवायला जाण्याचे कारण पुढे करून मणूर गावातील एका धाब्यावर नेले. 

जेवणानंतर आरोपींनी  आपल्या एका मित्राची अक्कलकोटजवळ कडबगाव येथे बंद पडलेली रिक्षा दुरूस्त  करण्यासाठी जाऊ म्हणून फिर्यादी जखमी मित्राला दुचाकीने नेले. तेथे जवळच गुरववाडीत आले असता तेथे कुठलीही बंद पडलेली रिक्षा नव्हती. तेव्हा आरोपी जमीर मुल्ला याने दुचाकीचूया डिक्कीतून बिअरची बाटली काढली. बिअर पिऊन त्याने फिर्यादी तरूणाला शिवीगाळ करीत बिअरची बाटली डोक्यावर मारली. तेव्हा रक्तस्त्राव होत असताना इतर आरोपींनी त्याला वेताच्या काठीने जबर मारहाण केली.  

घाबरलेला फिर्यादी हा, मला का मारता ? माझे काय चुकले ? मला मारहाण करू नका असे म्हणून गयावया करू लागला. आरोपी हुसेनी जेऊरे याने, तू आमच्या डोक्यात बसला आहे. तुला खूप मस्ती आहे. तुला आता जिवंत सोडणार नाही, असे म्हणून  त्याच्या छातीवर जोराची लाथ मारून  त्याला  खाली पाडले. नंतर त्याला  विवस्त्र करून ब्लेडने त्याचे संपूर्ण गुप्तांग कापले. कापलेले गुप्तांग तेथेच टाकून दिले. यात प्रचंड रक्तस्त्राव होऊन फिर्यादी बेशु द्ध पडला. तेव्हा तिन्ही आरोपींनी तेथून पलायन केले.

दरम्यान, पहाटे शुध्दीवर आल्यानंतर फिर्यादी जखमीने तेथील एका पादचा-याचा मोबाइल मागून आपल्या भावाशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन फिर्यादी जखमीला तात्काळ सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय  रूग्णालयात दाखल केले. आरोपींनी कापून टाकून दिलेले गुप्तांग रूग्णालयात शस्त्रक्रिया करून पुन्हा बसविण्यात आले. या खटल्यात सहायक सरकारी वकील नागनाथ गुंडे व माधुरी देशपांडे यांनी १४ साक्षीदार तपासले. यात फिर्यादीसह डॉक्टर, फिर्यादीला मोबाइल उपलब्ध करून देणारा पादचारी, पोलीस निरीक्षक सी. बी. भरड आदींची साक्ष महत्त्वाची ठरली. परिस्थितीजन्य पुरावाही महत्त्वाचा ठरला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फिर्यादी जखमी तरूण जीवनात सामान्य माणसासारखे लग्नानंतर वैवाहिक आयुक्त उपभोगू शकत नसल्याची बाब समोर आली. 

त्यामुळे जखमीला जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याबाबत उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निवाड्यांचा संदर्भ देत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. औटी यांनी तिन्ही आरोपींना कठोर शिक्षा सुनावताना जखमीला प्रत्येकी दहा लाखांप्रमाणे ३० लाख रूपयांची  नुकसान भरपाई अदा करावी, असा आदेश दिला. या खटल्यात मूळ फिर्यादीतर्फे ॲड. हुसेन बागवान तर आरोपींतर्फे ॲड. रियाज शेख यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments