करमाळा | कान्होळा नदीच्या पुलावर मन हेलावून टाकणारी घटना; आळजापुरवर शोककळा


करमाळा |

करमाळा तालुक्यातील पोथरेजवळ असलेल्या कान्होळा नदीच्या पुलावर काल (शनिवारी) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मन हेलावून टाकणारी घटना घडली. मटारसायकल आणि ट्रॅक्टरच्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर मुलगी व पती जखमी झाले आहेत. महाशिवरात्री दिवशीच ही दुःखद घटना घडल्याने आळजापुरवर शोककळा पसरली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव मनीषा अंकुश रोडे (वय ४०) असे आहे. तर जखमी झालेल्या मुलीचे समृद्धी व पतीचे नाव अंकुश असे नाव आहे. दिवसभर शेतात काम करून ते निघाले होते. दरम्यान मोटारसायकलवर जात असताना मनीषा यांच्यावर कान्होळा नदीवर आल्यानंतर काळाने घाला घातला. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. या अपघातात ठार झालेल्या मनीषा यांच्या मृतदेहावर आज (रविवारी) अंत्यसंस्कार झाले.

त्यांना एक मुलगा आहे. नुकताच तो खासगी नोकरीत लागला होता. त्याचाही काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यानंतर काही दिवसातच अपघात होऊन आई ठार झाली असल्याने व बहिण आणि वडील जखमी झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे दुःख व्यक्त केले जात आहे. अपघातस्थळी कान्होळा नदीच्या पुलावर पडलेली मोटारसायकल आणि रस्त्यावर पडलेला रक्ताचा सडा मन हेलावून टाकत आहे.

अपघातस्थळी पायातील सॅन्डल आणि बाजरीची पिशवी पडलेली आहे. हा अपघात कसा झाला? हे अजून अधिकृत समजू शकलेले नाही. ते नेमके कोठे जात होते याचाही उलघडा झालेला नाही. मात्र जागेवर ठार झालेल्या महिलेमुळे आणि दोघेजण जखमी असल्यामुळे त्याची तीव्रता लक्षात येत आहे. कान्होळा नदीवरील पुलावर झालेला हा पहिला अपघात आहे असे नाही. यापूर्वीही येथे लहान- मोठे अपघात झालेले आहेत.

पुलाला काही ठिकाणी सुरक्षारक्षक नळ्या नाहीत. गेल्यावर्षी याच पुलावरून ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर खाली कोसळला होता. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नव्हती. यापुढे अपघात होणार नाहीत याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. काल अपघातग्रस्तांना पोथरेचे पोलिस पाटील संदीप पाटील, गोपीनाथ झिंजाडे, शहाजी झिंजाडे, पपू रणवरे, संदीप नंदरगे, दयानंद रोही आदींनी अपघातग्रस्तांना मदत केली.

Post a Comment

0 Comments