बार्शीत मोकाट फिरणाऱ्या डुकरांवर नगरपरिषदेकडून कारवाई ; तब्बल ३०० डुक्कराचा बंदोबस्तबार्शी |

बार्शी नगर परिषदेमध्ये मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी गेल्या काही दिवसापासून होत होती, त्या अनुषंगाने बार्शी नगरपालिकेच्या वतीने ३०० डुक्कराचा बंदोबस्त करण्यात आला. शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी वाढता मोकाट वराहांचा वावर आणि शहरातील नागरिकांच्या वराह बाबतीत वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने बार्शी नगरपरिषदेचे मा मुख्याधिकारी तथा प्रशासक शबाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व वराह पालन करणाऱ्या व्यक्तींची दिनांक  १६ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीमध्ये वराह पालन करणाऱ्या व्यक्तींना १५ दिवसांत सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या वराहांचा बंदोबस्त करून स्वतःच्या जागेत बंदिस्त ठिकाणी त्यांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. 

तसेच यापूर्वीही वराह पालन करणाऱ्या व्यक्तींवर नगरपरिषदे कडून गुन्हे व दंडात्मक कारवाई करण्यात आलेली होती. सदरची कारवाई करून देखील वराह पालन करणाऱ्या व्यक्तींवर याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून आले. शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोकाट वराहांचा वावर खूपच प्रमाणात झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन याबाबत तक्रारी आलेल्या आहेत. 

यावर उपाययोजना म्हणून नगरपरिषदेकडून शहरातील मोकाट वराहांचा बंदोबस्त करण्यासाठी जाहीर निविदा प्रसिद्धीकरण करून रितसर मंजुरीने सदर कामाचा आदेश हुबळी येथील ठेकेदारास देण्यात आला. मोकाट वराह पकडण्यासाठी संबंधित वराह मालकांकडून प्रतिकार होण्याची शक्यता नाकरता येत नसल्यामुळे नगरपरिषदेकडून रितसर पोलिस बंदोबस्ताची मागणी देखील करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने संबंधित ठेकेदारामार्फत पोलिस बंदोबस्तासह दिनांक २८ फेब्रुवारी रोजी तीन वाहनाद्वारे शहरातील अंदाजे ३०० मोकाट वराह पकडण्यात आलेली आहेत. वराह पकडण्याची कार्यवाही चालू असताना संबंधित वराह मालक व महिलांनी प्रतिकार करून नगरपरिषद कर्मचारी व संबंधित ठेकेदार यांचेवर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केलेला आहे. संबंधित अडथळा करणाऱ्यावर पुढील कायदेशीर कार्यवाही नगरपरिषद करणार आहे. 

सदरची कार्यवाही करतेवेळी नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रमुख  शब्बीर वस्ताद, स्वच्छता निरीक्षक- नितीन शेंडगे, हर्शल पवार, लोकेश काकडे, अर्जुन कांबळे, मुकादम- नेमीनाथ पवार, दिपक ओहोळ, सोमनाथ झोंबाडे, सुपरवायझर - अप्पा चौगुले, सचिन सोनवणे, कनिष्क शिंदे, दत्ता पवार, संदिप अवघडे, शेखर कसबे, अतिश रोकडे, लखन पवार, बळी पवार, महादेव पवार, महेश कसबे, नागेश कांबळे, संदल कांबळे, धिरज गजधने, अभयराज ओहोळ, विनोद लंकेश्वर, जयपाल वाघमारे इ. आरोग्य विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते. यापुढे वराह मालकांनी त्यांचे स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये बंधिस्त वराह पालन करण्यात यावेत. नगरपरिषदेच्या सार्वजनिक रस्त्यावर वराह आढळून आल्यास यापुढेही अशीच कठोर कारवाई करण्यात येईल याची संबंधित वराह मालकांनी नोंद घ्यावी असे नगरपरिषद प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments