मोहोळ | जमिनीच्या वादातून पुतणीला फेकले सीना नदीत फेकले


मोहोळ |

आईच्या नावावरील 6 एकर जमीन माझ्या नावावर करून न देण्यासाठी तुम्ही दोघेच जबाबदार आहात, आता तुमचा वंशच शिल्लक ठेवत नाही, असे भाऊ आणि भावजय यांना धमकावून सख्ख्या भावानेच भावाच्या चार वर्षाच्या मुलीचा खून करून मृतदेह सीना नदी पात्रात टाकून दिल्याची घटना सोमवारी सकाळी आठ च्या सुमारास मलिकपेठ येथील सीनानदी पात्रात घडली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशोधन शिवाजी धावणे (रा. डिकसळ ता. मोहोळ) यांच्या कुटुंबास एकूण 16 एकर जमीन आहे. त्यापैकी यशोधन धावणे याचे नावावर 5 एकर, त्यांचा भाऊ यशोदीप धावणे यांच्या नावावर 5 एकर तर बाकीची 6 एकर जमीन त्यांच्या आईच्या नावावर आहे. आईच्या
नावावर असलेली 6 एकर जमीन माझ्या नावावर करा म्हणून यशोदीप वारंवार भांडण काढत होता. त्यास गावातील प्रतिष्ठित लोकांनी बऱ्याचवेळा समजावले होते. आईवडील असेपर्यंत त्यांच्या नावावर राहू द्या, नंतर ती तुम्हा दोघा भावांच्या नावावरच होणार आहे, असे वेळोवेळी समजावत होते.

सोमवारी सकाळी सातच्या सुमारास यशोदीप हा त्याचा भाऊ यशोधन बरोबर शेताच्याच कारणावरून तक्रार करू लागला. आईच्या नावावरील सहा एकर जमीन माझ्या नावावर करू न देण्यासाठी तुम्ही दोघे नवरा बायको जबाबदार आहात', असे म्हणत मोठमोठ्याने शिवीगाळ करीत गोंधळ घालू लागला. भाऊ यशोधन व त्याची पत्नीस आज तुमचा फैसलाच करतो, तुमचा वंशच ठेवत नाही, म्हणून शिवीगाळ करीत होता. त्यास काही लोकांनी समजावून सांगून शांत केले. यशोधन त्याची पत्नी व आई असे शेतातील कामे करण्यासाठी सकाळी साडेसातच्या सुमारास निघून गेले. घरात वडील व मुलगी ज्ञानदा झोपले होते. थोड्या वेळाने यशोधन घरी आला तेव्हा त्यास त्याची मुलगी दिसली नाही. त्यावेळी त्याचा भाऊ यशोदीप याने ज्ञानदाला मलिकपेठ येथे सीना नदीत टाकून दिले असल्याचे सांगितले. तेव्हा घाबरून यशोधन व इतर सर्व जण मलिकपेठ येथे नदीवर आले असता पुलाच्या पूर्वेस मुलगी ज्ञानदा ही तरंगत असताना दिसली. जमलेल्या लोकांनी तिला पाण्यातून बाहेर काढले आणि तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून ती मृत झाल्याचे सांगितले. याबाबत मुलीच्या पित्याने फिर्याद दिली असून मुलीचा चुलता यशोदीप धावणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments