'येथे' सापडला बोगस डॉक्टर ; पोलिसांनी केला गुन्हा दाखल



अमरावती |

अमरावती येथे शिराळा गावामध्ये समीर बाला याने आपले खाजगी रुग्णालय गेल्या काही वर्षापासून सुरू केले होते. मुळव्याध, भगंदर, फिशर यासंबंधीचे उपचार या रुग्णालयातून तो करत होता. उपचार घेण्यासाठी दूरवरून रुग्ण त्याच्याकडे येत होते. त्याच्या उपचाराने रुग्ण बरे होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. प्रशासन स्तरावर सध्या बोगस डॉक्टर शोधण्याची मोहीम सुरू आहे. अशातच अमरावती पंचायत समितीच्या अंतर्गत बोगस डॉक्टर समितीच्या पथकाने कारवाई करत बोगस डॉक्टर बाला यांच्या रुग्णालयाची तपासणी केली. त्यादरम्यान डॉ. बाला यांच्या रुग्णालयात पथकातील अधिकाऱ्यांना रुग्णालयात मोठ्या प्रमाणामध्ये औषधी साठा आढळला होता.

पथकाने डॉक्टर बाला याला त्याचे नोंदणी प्रमाणपत्र मागितले असता डॉ. बालाने डॉक्टर मोहीब अरहील नसीब अहमद खान यांच्या नावाचे एमबीबीएस प्रमाणपत्र दाखवले. सदर प्रमाणपत्र हे त्याचे स्वतःचे नसून अन्य व्यक्तीचे असल्याचे तपासणी दरम्यान पथकाच्या लक्षात आले. पथकाने संपूर्ण चौकशी करून डॉक्टर बाला याचे रुग्णालय सील केले. चौकशीच्या अंतिम टप्प्यात दुपारी वलगाव पोलीस ठाण्यात विस्तार अधिकारी राम कृष्णराव पिंजरकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे कळताच बोगस डॉक्टरने गावातून पोबारा केला. त्या बोगस डॉक्टरच्या शोधात पोलीस पथक रवाना केल्याचे पोलिसांनी सांगितले.

२२ मे २०२२ रोजी शेंदूरजनाघाट येथे आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या मदतीने २ बोगस डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परवाना नसताना देखील बोगस डॉक्टर वैधकीय सेवा देत असल्याची माहिती समोर आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून बोगस डॉक्टर रुग्णाच्या जीवाशी खेळत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाला मिळाल्या होत्या. तेंव्हा आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई केली होती. पोलिसांनी २ बोगस डॉक्टरांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र वैधकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अन्वये गुन्ह्याची नोंद केली होती.

Post a Comment

0 Comments