कोणी बायको देता ! बायको लग्नासाठी... जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


सोलापूर |

लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक नवरदेवांचा मंडवळ्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्हाला बायको मिळवून द्या, या मागणीसाठी ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ज्योती क्रांती परिषदेचे संस्थापक रमेश बारस्कर यांनी दिली. राज्यामध्ये दिवसेंदिवस मुलींची संख्या कमी होत चालल्यामुळे तरुण मुलांच्या लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण झाले आहे. अनेक तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. मुलांची लग्न न झाल्यामुळे आईबापाची काळजी दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्यांना वेगवेगळ्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. याबाबत सरकारने योग्य धोरण राबवावे ही मागणी केली जाणार आहे. 

सरकारने केलेल्या कायद्यामुळे लोकसंख्येवर निर्बंध आले आहेत. मात्र, गर्भलिंग निदान चाचणीचा कायद्याची अंमलबजावणी राज्यामध्ये नियमानुसार होत नाही. महाराष्ट्रासह परराज्यामध्ये गर्भलिंग निदान चाचणीच्या माध्यमातून मुलीऐवजी मुलांना प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे मुलींची संख्या कमी झाली आहे. वेळेत लग्न जमत नसल्याने मुले व्यसनाधीन होत आहेत. तरुणांना सशक्त करणे ही सरकारची जबाबदारी असून याबाबत सरकारने विचार करावा. सोलापूर जिल्ह्यातल्या लग्न न झालेल्या अनेक तरुण मुलांचा विचार करून तरुणांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी बुधवार दि.२१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोहोळ परिसरातील लग्न न झालेल्या नवरदेवांचा डोक्याला मुंडवळ्या बांधून मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही यावेळी बारसकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments