रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



सोलापूर |

सोलापूर जिल्हा साखरपट्टा असून या भागाच्या विकासासाठी रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

करमाळा तालुक्यातील शेलगाव भाळवणी येथील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या ऊस गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात  ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार राजेंद्र राऊत, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रा. राम शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार नारायण पाटील, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल, संचालक रश्मी बागल, महेश चिवटे आदी उपस्थित होते.


मुख्यमंत्री  श्री. शिंदे म्हणाले की,  मंत्रीमंडळ बैठकीत रखडलेल्या सिंचन योजनांना सुधारित मान्यता देऊन कामांना गती देण्याचा या सरकारने प्रयत्न केला असून त्यातून सुमारे २ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबतही जलसंधारण विभागाची तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल. राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान असून, राज्यात १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार काम करत असून शेतकरी, कष्टकरी, वारकरी, असंघटित कामगार असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी व्हावा, अशी सरकारची भूमिका आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे, त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत.  करमाळा तालुक्यातील विकास प्रकल्प पूर्ण केले जातील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Post a Comment

0 Comments