उप महाराष्ट्र केसरी पै.अमृत भोसलेंना घडवणारी आई ग्रेटचकोल्हापूर / पै.प्रदिप तानुगडे ( राष्ट्रीय कुस्तीपटू ) -

मुलाला लहानाचं मोठं करणं. त्यांचा संभाळ करणं. अन् त्याला चांगला पैलवान बनवण्यासाठी काळजावर दगड ठेवत मुलाला तालमीत धाडणारी पैलवानाची 'आई' ही ग्रेटच असते. 

अशीच एक आई म्हणजे स्व. मालुताई पांडुरंग भोसले. आपल्या मुलाने चांगला पैलवान बनावं अशी तिची इच्छा. याच इच्छेची पुर्तता त्यांचे पुत्र पै.अमृता (मामा) भोसले यांनी केली. आपल्या आई - वडीलांचे कष्टाचे पांग त्यांनी आपल्या कुस्ती कारकिर्दीत फेडले. अमृत मामांना त्यांच्या आईने घरातून कायम प्रोत्साहन दिले. चांगला पैलवान होण्यासाठी आशिर्वाद दिले. आपल्या आईला दिलेल्या शब्दाची जाण ठेवत अमृत मामांनी कुस्ती क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. अफाट कुस्ती मेहनत करत त्यांनी अनेक मल्लांना आस्मान दाखवले व आई - वडीलांचे नाव केले.

आपल्या खेळाच्या जोरावर त्यांनी उप महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. किती जरी मोठ्ठं बनलं तरी जमिनीवर कसे रहावे व अंगी नम्रता कशी बाळगावी, अशी आपल्या आईने दिलेली शिकवण अमृत मामा कधी विसरले नाहीत. 

आईने दिलेल्या संस्कारावर वाटचाल करत अमृत मामांनी यशाला खरी गवसणी घातली. त्यांच्या पाठीवर सतत आईचा हात होता. मामांनी कुस्तीतून निवृत्ती घेतली अन् इचलकरंजी मध्ये नवोदित मल्लांना घडवायला सुरु केले. तसेच मामांनी इचलकरंजीच्या राजकीय क्षेत्रामध्ये ही आपले नाव केले. तांबड्या मातीच्या सेवेसह जनसेवा ही प्रामाणिक करण्याचा सल्ला अमृत मामांच्या आईने त्यांना दिला. मामांनी कायम आपल्या आईचा शब्द प्रमाण मानला व यशोशिखर गाठले. अमृत मामांचा लळा आईला व आईचा लळा अमृत मामांना होता. आई नावाची माया, मार्गदर्शक ही अमृत मामांच्या मागे होती.

अचानक मायेचे हे छत्र मामांच्या डोक्यावरुन नाहीसं झालं. नुकतेच अमृत मामांच्या आईचे निधन झाले. आईचे उत्तर कार्य विधी गोरंबे ता.कागल जि.कोल्हापूर येथे झाले. आपल्या आईच्या आठवणी झाडांच्या, फळा - फुलांच्या माध्यमातून कायम जिवंत राहाव्यात या हेतूने या वेळी नातेवाईक, पै-पाहूणे, मित्र परिवाराला पै.अमृत मामांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश देत, वृक्ष रोपे भेट देत उत्तर कार्य पार पाडले. आपल्या आईच्या शिकवणी नुसार अमृत मामांनी यावेळी अनोखा संदेश दिला. असा आदर्श पुत्र घडवणाऱ्या आईस विनम्र आदरांजली.

Post a Comment

0 Comments