कोल्हापूर |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कोल्हापूरला मर्दानी खेळाची गौरवशाली परंपरा आहे. मात्र, ही परंपरा काळाच्या ओघामध्ये नष्ट होण्याच्या आधी मर्दानी खेळांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा, असे आवाहन फिल्मफेअर पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सूर्यवंशी यांच्या फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त 'वारसा' लघुपटाचे विद्यापीठात सादरीकरण करण्यात आले. यावेळी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.
डॉ. शिर्के यांच्या हस्ते यावेळी सूर्यवंशी यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला. अर्थशास्त्र अधिविभागाच्या सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.
शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगून सचिन सूर्यवंशी म्हणाले, कोल्हापूरला शिवकालीन मर्दानी खेळांचाही वारसा आहे. हा वारसा जतन करणे खूप आवश्यक आहे. यासाठी जुन्या कोल्हापुरातील लोकांनी जतन केलेली ही कला आणि कौशल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. शिवकालीन युद्धकला लाठ्या- काठ्यासह सर्वच प्रकारचे मर्दानी खेळ शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहेत.
'वारसा' लघुपटाविषयी ते म्हणाले, या लघुपटामध्ये शिवकालीन संदर्भासह मर्दानी खेळांचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झालेले हस्तांतरण चित्रबद्ध केले आहे. कोल्हापूरच्या मातीमध्ये प्रामाणिकपणा आहे. शिवाय एक प्रकारचा रांगडेपणा आहे. छत्रपती शिवरायांवर काम करायचे असल्यास कोल्हापूरकर उत्स्फूर्तपणे मदत करतात. कोणतेही काम करत असताना अनंत अडचणी असतात. मात्र, त्या अडचणींचे भांडवल न करता हेतू शुद्ध ठेवून काम केले पाहिजे. कामामध्ये तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर व्हायला पाहिजे. आपल्याला जे खटकते, ते मांडण्यावर आपला भर असला पाहिजे.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कोणत्याही विद्यापीठाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात विद्यार्थ्यांचे योगदान मोठे असते. विद्यार्थ्यांबरोबरच कर्मचारी ही तितकेच महत्त्वाचे आहेत. वस्ताद आनंदराव ठोंबरे यांचे लोकसंस्कृती आणि मर्दानी खेळ जनमानसात रुजवण्यात योगदान खूप मोठे आहे. त्यांनी मर्दानी खेळाचा वारसा समर्थपणे पुढच्या पिढीकडे दिला. स्थानिक कला, लोकविद्या आणि लोकसंस्कृती आपण सर्वांनी मिळून जपली पाहिजे. 'वारसा' लघुपटामध्ये सचिन सूर्यवंशी यांनी मर्दानी खेळांना पुढे घेऊन जाण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. किंबहुना त्यांनी या खेळ प्रकाराचे केलेले दस्तावेजीकरण अत्यंत मौलिक आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया, एमएसएमएसचे तांत्रिक सल्लागार मिलिंद पाटील, गार्डन क्लबच्या कल्पना सावंत, पल्लवी कुलकर्णी, चित्रकार स्वप्निल पाटील, आकाश बोकमुरकर, अर्चना माने, मतीन शेख, मल्हार जोशी, सचिन दिवाण आदी उपस्थित होते.
अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. समृद्धी पाटील हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. जावेद तांबोळी यांनी आभार मानले.
0 Comments