अनोखे लग्न, जुळ्या बहिणींनी केला एकाच मुलासोबत लग्न; सोलापरातील घटना
सोलापूर |

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे एक अनोखे लग्न पार पडले आहे. दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केला आहे. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच चर्चा सुरू आहे. एकाच मुलासोबत, एकाच वेळी सख्ख्या दोन बहिणींनी वरमाला घातली आहे. या दोन जुळ्या बहिणींच्या आगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे. हा विवाह सोहळा शुक्रवारी अकलूज- वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे संपन्न झाला आहे. अतुल हा सोलापूरचा असून दोन्ही जुळ्या बहिणी मुंबई मधील कांदिवली येथील आहेत.

अतुलने दोन्ही बहिणींना खूप मदत केली होती-
अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील आहे. अतुलचा मुंबई येथे ट्रॅव्हल्स एजन्सीचा व्यवसाय आहे. तर कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि टिंकी या जुळ्या बहिणी आहेत. सहा महिन्यांपूर्वी पिंकी, टिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल नावाच्या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने रुग्णालयात त्यांची काळजी घेतली होती. यातून त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला.

टिंकी आणि पिंकी उच्चशिक्षित मुंबई येथील आईटी कंपनीत नोकरीस-
टिंकी आणि पिंकी हे उच्च शिक्षित आहेत. मुंबई येथील एका आयटी कंपनीत इंजिनीअर पदावर कार्यरत आहेत. टिंकी आणि पिंकी सख्ख्या जुळ्या बहिणी आहेत. या दोघींचं शिक्षण एकत्रित झाले आहे. त्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरीला देखील लागल्या आहेत. लहानपणापासूनच या दोघी एकमेकींसोबत वाढल्या आहेत. दोघींनाही एकमेकींची एवढी सवय झाली की त्यांनी एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करून त्याच्यासोबत सप्तपदी घेतली.

टिंकी, पिंकी आणि त्यांच्या आईची अतुलने रुग्णालयात खूप काळजी घेत मदत केली होती-
काही वर्षांपूर्वी टिंकी आणि पिंकी यांच्या वडिलांचे अकस्मात निधन झाले आहे. त्यानंतर दोघी जुळ्या बहीणी आईसोबत राहत होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी टिंकी, पिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्या होत्या. यावेळी अतुल या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने तिघींनाही रुग्णालयात दाखल केले. अतुल याने त्या तिघींचीही भरपूर निस्वार्थ मनाने सेवा केली होती. अतुलने केलेल्या कामामुळे तिघींनाही अतुल विषयी आपुलकी निर्माण झाली होती. यातूनच जुळ्या बहीणीमधील एकीचे अतुलवर प्रेम जडले. परंतु त्या दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या वेगळं होऊन राहू शकत नव्हत्या. त्यामुळे आईच्या आणि अतुल याच्या कुटुंबीयांच्या संमतीने दोघींनीही अतुल याच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. या अनोख्या विवाहाला दोन्ही कुटुंबातील शेकडो पाहुणे मंडळी गलांडे हॉटेलमध्ये उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments