भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्यासह ८ जणांना नोटीस


सोलापूर :

जुळे सोलापूर येथील महात्मा बसवेश्वर उद्यानाची जागा निश्चित करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाने येत्या २९ सप्टेंबर रोजी कोर्ट कमिशनद्वारे मोजणीचा निर्णय घेतलेला आहे. देशमुख यांच्यासह सुहास हुंबरवाडी, तसेच जुळे सोलापुरातील वानकर कुटुंबीय अशा ८ जणांना मोजणीच्यावेळी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

जुळे सोलापुरात वसुंधरा महाविद्यालयाच्यासमोर महापालिकेची जागा आहे. त्यात महात्मा बसवेश्वर उद्यानाचे काम सुरू केल्याची तक्रार वानकर कुटुंबियांकडून करण्यात आली होती, त्यामुळे या उद्यानाचे काम पूर्ण व्हावे यासाठी या भागातील काही कार्यकर्त्यांनी एक समिती गठित केली असून, समितीने जागेच्या मोजणीची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण सोलापूर दिवाणी न्यायालयात गेले आहे.


या दरम्यान निरंजन वानकर यांनी जागेच्या मोजणीबाबतचा अर्ज केला आहे. त्यानुसार महापालिका आणि भूमिअभिलेख कार्यालयाने कोर्ट कमिशनद्वारे मोजणीचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात महापालिकेला प्रतिवादी करण्यात आलेले असून, या मोजणीच्या कामावेळी आजुबाजूचे जागा मालक असलेले आमदार सुभाष देशमुख, अनिल आबुटे, दत्तात्रय वानकर, लक्ष्मण वानकर, भीमराव वानकर, प्रभाकर क्षीरसागर, वसुंधरा कला महाविद्यालयाच्या संचालकांनी उपस्थित रहावे, असे या नोटिशीत नमूद केले आहे. या मोजणीवेळी गैरहजर राहिल्यास पक्षकाराने दाखविलेल्या वहीवाटीनुसार मोजणी पूर्ण करून न्यायालयात अहवाल सादर केला जाणार आहे, असा इशाराही देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments