सोलापूर ! ऑटो रिक्षा मधून ११० लिटर हातभट्टी दारू जप्तसोलापूर/प्रतिनिधी:

 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक अ विभागाने  एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील स्वागत नगर येथे एका ऑटो रिक्षा मधून ११० लिटर  हातभट्टी दारूची वाहतूक होताना आढळून आल्याने गुन्हा नोंदविला आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक अ २ विभाग उषाकिरण मिसाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी सोलापूर शहरातील ताई चौक ते  स्वागत नगर या परिसरात पाळत ठेवली असता त्यांना एका बजाज कंपनीच्या ऑटो रिक्षा क्रमांक एम एच १३ बी व्ही ११७१ मधून हातभट्टीची वाहतूक होत असताना आढळून आल्याने त्यांनी सदर वाहन थांबून तपासणी केली असता त्यात प्लास्टिकच्या कॅनमधून एकूण ११० लिटर हातभट्टी दारू मिळून आली. सदर गुन्ह्यात ऑटो रिक्षा चालक हा जागेवरून पळून गेला असून वाहनात बसलेला वाहतूकदार इसम हणमंतू नरेंद्र गुंडेटी, वय ३४ वर्षे, रा. अंबिका नगर सोलापूर यास अटक करण्यात आली असून त्याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याच्या ताब्यातून ऑटो रिक्षा व ११० लिटर  हातभट्टी दारू असा एकूण एक लाख ३१ हजार पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. फरार ऑटो चालकाचा शोध घेण्यात येत असून तपास दुय्यम निरीक्षक अ २ उषाकिरण मिसाळ ह्या करीत आहेत. सदरची कारवाई निरीक्षक अ विभाग एस.एस. फडतरे, दुय्यम निरीक्षक उषाकिरण मिसाळ, सहायक दुय्यम निरीक्षक बिराजदार, चव्हाण व जवान शोएब बेगमपुरे व  प्रियंका कुटे यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments