सोलापूर! सराईत गुन्हेगार विजय उर्फ आण्णा सुभाष कोरे याच्यावर एमपीडीए कायदयाअंतर्गत कारवाई


सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील विजय सुभाष कोरे,(वय वर्षे ४२),राहणार नान्नज, तालुका उत्तर सोलापूर हा शरिराविषयक व मालाविषयक गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार असून मागील पाच वर्षात दखलपात्र स्वरूपाचे ८ व अदखलपात्र स्वरूपाचे ५ असे गुन्हे दाखल होते. तो मागील अनेक वर्षांपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी व त्याची दहशत व भिती राहावी याकरीता नागरीकांशी गुन्हेगारी वर्तन करत होता. त्याच्या विरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाणे तसेच सदर बझार पोलीस ठाणे येथे धार्मिक भावना दुखवुन दोन समाजात तेढ निर्माण करणे, जबरीने मालमत्ता घेण्याकरीता इच्छापुर्वक दुखापत करणे, लोकांची फसवणुक करणे,महिलांची छेडछाड करणे, दगड फेकुन मारणे, रस्ता अडवुन वाहनाचे नुकसान करणे, मारहाण करणे, शिवीगाळी व दमदाटी करणे,न्यायालयीन कर्मचारी (बेलीफ) यांना शिवीगाळी दमदाटी करून धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करुन विजय कोरे याने परिसरात दहशत व भिती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत निर्माण करून स्वतः स धोकादायक इसम म्हणून सिध्द केले होते. विजय कोरे याच्यावर यापुर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. तरीसुध्दा त्याच्या वर्तनात फरक

पडला नसल्याने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालिन प्रभारी अधिकारी सत्य साई कार्तीक यांनी M.P.D.A. कायदया अंतर्गत स्थानबध्द करणेबाबत पोलीस अधीक्षक यांच्या मार्फतीन जिल्हादंडाधीकारी, सोलापूर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. जिल्हादंडाधीकाऱ्यांनी गुन्हेगार विजय उर्फ आण्णा कोरे याचे M.P.D.A. अधिनियम, १९८१ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केल्याने त्यास आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी ताब्यात घेवून त्याबाबतची माहिती देवून पो.नि. शिंदे यांनी आदेशाची बजावणी करून पुण्यातील येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments