काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार दिल्यामुळे त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी या पक्षाला मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. मात्र ते करताना सध्याचे संख्याबळ पाहता महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडून आपल्याच मित्राचे आमदार पळवले जाण्याची शक्यता असल्यामुळे ही निवडणूक आघाडीतील बेबनाव वाढण्यास हातभार लावणारी ठरणार आहे.
विशेष म्हणजे याचा फटका नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेलाच अधिक बसण्याची शक्यता आहे. एक उमेदवार निवडून येण्यासाठी 27 मतांची गरज आहे. त्यामुळे 55 आमदार असलेल्या शिवसेनेचे दोन उमेदवार सहज विजयी होतील. मात्र राष्ट्रवादीलाही आपले दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी चार अपक्षांच्या पाठिंब्याची गरज पडेल. संजय मामा शिंदे, देवेंद्र भुयार, राजेंद्र यड्रावकर असे अजित पवार यांचे समर्थक अपक्ष आमदार असल्यामुळे राष्ट्रवादीचीही वाट निर्विघ्न होण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी किमान दहा मतांची गरज आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत असणाऱ्या अपक्ष आमदारांवरच काँग्रेसची नजर खिळली असून ते सेनेला तापदायक ठरणार आहे.
राज्यसभेतील पराभवानंतर शिवसेना अस्वस्थ आहे. संजय राऊतही तसे काठावरच पास झाले आहे. त्यामुळे शिवसेना धोका पत्करणार नाही. तसेच त्यांनी काही अपक्षांना आपल्या कोट्यातून मंत्री बनवले असल्यामुळे त्या अपक्षांवर त्यांचा नक्कीच अधिकार आहे. अशा स्थितीत जर काँग्रेसने सेना समर्थक अपक्ष फोडले तर ते आघाडीत संशयकल्लोळ निर्माण करण्यास चालना देणारे ठरेल.
शिवसेनेकडे शंकरराव गडाख, बच्चू कडू, आशिष जयस्वाल, गीता जैन असे काही अपक्ष आहेत. काँग्रेसने याच अपक्षांवर नजर ठेवून हालचाली सुरु केल्या आहेत. यातील बच्चू कडू, शंकरराव गडाख हे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री असल्यामुळे त्यांच्या मतांचा निर्णय शिवसेनेकडे आहे. काँग्रेसने भाई जगताप, तर भाजपने प्रसाद लाड हे अतिरिक्त उमेदवार दिले आहेत.
भाजपला प्रसाद लाड यांच्यासाठी 13 मते जमवायची आहेत, तर काँग्रेसला भाई जगताप यांच्यासाठी अजून 10 अतिरिक्त मतांची गरज आहे. राज्यसभेत पराभव झाल्यानंतरही शिवसेनेला मित्रपक्षांना फार काही बोलता आलं नाही. कारण, सरकार त्यांच्याच बळावर उभं आहे. आता सरकार टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या काँग्रेसनेही फोडाफोडी सुरु केल्यामुळे व त्यासाठी प्रयत्न करण्यास काय हरकत आहे, अशी भूमिका घेतल्यामुळे फोडोफोडी सरकारच्याच मुळावर उठण्याची शक्यता आहे.
0 Comments