"हालमत संस्कृती", धनगरी परंपरा : हेडाम नृत्य✒️शाहीर संतोष जाधव. मु.पो.-येलूर. ता- वाळवा, जि. सांगली. संपर्क नंबर- ७३८७७१२५२५
     
आपल्या देशात,राज्यात अनेक जाती,धर्म,पंथ वेग-वेगळे आहेत. प्रत्येक धर्माच्या रूढी-परंपरा या वेग वेगळ्या आहेत. त्याचप्रमाणे  हालमत(हलूमथ) हा धर्म आहे.  हा शब्द मूळ कन्नड शब्दातून आला आहे.हाल म्हणजे दूध,  मत म्हणजे पवित्र/शील, असा हा पवित्र हालमत धर्म दुधापासून निर्माण झाला आहे,असं हालमत पुराण सांगतं.याच धर्मामध्ये अनेक सांस्कृतिक रूढी-परंपरा जपल्या जात आहेत. या धर्मा मध्ये अफाट भक्ती केली जाते. त्यामध्ये श्री. बिरोबा ,महालिंगराया सुऱ्याबा,जकराया विठोबा,म्हाळोबा,म्हसकोबा इ. श्रद्धास्थाने आहेत. ही लोक दैवते प्रथम पूजनीय आहेत.याच देवांची भक्ती करत असताना,  धनगरी धर्माला लाभलेली एक संस्कृती त्यामध्ये _हेडाम..._

त्याविषयी थोडंसं, 

  हेडाम:- _हेडाम हा खेळ नेमका कोणी पहिला खेळाला हे सांगणं थोडं कठीण आहे. श्री. बिरदेव यांचे दोन शिष्य होऊन गेले, एक सुऱ्यापा आणि दुसरा महालिंगराया. या दोन शिष्यानी हेडाम खेळलं होतं,हे सांगितलं जातं. पण पहिलं कोणी खेळलं असावं या विषयी मतभेद आहेत._

हेडाम कोण खेळतं ?:- _धनगरी धर्मामध्ये ज्या व्यक्तीला देवाशी एकरूप केलं जाते,म्हणजे (कंकण बांधतात त्यास देवर्षी अस म्हंटल जातं) ती व्यक्ती हेडाम खेळत असते.हेडाम खेळत असताना त्यांच्या बरोबर बावन्न-बिरुद, ढोल-कैताळ यांच्या  वाद्यात तल्लीन होऊन,हेडाम खेळणारा देवर्षी श्री.बिरुदेवाशी, (आपल्या गुरूशी) एकरूप होऊन,जीवाची आणि शिवाची भेट करून,हातात जोड हत्यार घेऊन तलवार पोटावर मारून घेतो. भंडारा उधळण होत असते.हेडाम खेळणं,पोटावर धारेची तलवार मारून घेणं,ही काय साधी-सुधी गोष्ट नाही.त्यासाठी देवावर भक्ती-श्रद्धा असावी लागते. ते काम कोणा ऐर्या- गय-याचं नाही.उदा:- आपण दाढी करत असतो.तेव्हा १० वेळा विचार करतो कि,ब्लेड कापणार तर नाही ना.मग ही पाजवलेली (धार लावलेली) तलवार पोटावर मारून घेणं ही काय साधी-सुधी गोष्ट आहे का?_

हेडाम खेळण्याचे प्रकार:- _तलवार पोटावर मारून घेणे,वेताची काठी पोटावर मारून घेणे.तसेच,हेडाम कसं खेळावे हा ज्या त्या हेडम्या (व्यक्तीवर) अवलंबून असतं.हेडाम खेळणाऱ्या व्यक्तीची पाळणूक  (उदा, मांसाहार जेवण न करणे ,माती ,उत्तरकार्य या ठिकाणी भोजन न करणे ,डबल कडवलेले जेवण न करणे .)अश्या अनेक गोष्टींची पाळनुक करावी लागते.

हेडाम नृत्य हे कधी खेळले जाते:- _धनगरी धर्मा मध्ये श्री. बिरदेवाची जळ-परडी सोडणे कार्यक्रम असेल,त्या वेळी खेळलं जाते.काही ठिकाणी वर्षाची यात्रा असते त्या वेळी जर वर्षी नित्यनेम असतो त्या वेळी पण हेडाम खेळलं जात .धनगरी धर्मात एखाद्याच लग्न असेल तर जक्यार काढताना हेडाम खेळलं जात._

सत्ययुगातील हेडाम श्री. महालिंगराया,श्री.सुऱ्यापा श्री.बिरदेवाचे शिष्य श्री. महालिंगराया यांनी श्री.बिरदेवा समोर हेडाम खेळलेलं ठिकाण सुक्षेत्र श्री. शिरडोन. जिल्हा- विजापूर,  राज्य -कर्नाटक. या जागी श्री.महालिंगराया यांनी हेडाम खेळण्याची सुरवात केली.  हेडाम का खेळले.?त्या विषयी दुसऱ्या भागात लिहतो.
सुक्षेत्र श्री.आरेवाडी. ता- कवठेमहांकाळ,जिल्हा- सांगली या ठिकाणी श्री. बिरदेवाचा शिष्य श्री.सुऱ्यापा यांनी गुरूच्या आशीर्वादाने हेडाम खेळण्यास सुरवात केली.
 सध्या कलीयुगामध्ये चालत आलेली नावाजलेली हेडमाची परंपरा सुक्षेत्र श्री.पट्टण कोडोली. ता-हातकणंगले,   जिल्हा- कोल्हापूर. कोल्हापूर गावापासून 15 किमी अंतरावर असणारं पट्टण कोडोली हे गाव जग जाहीर आहे. इथे श्री.विठ्ठल बिरूदेव मंदिर ऐतिहासिक आहे. _श्री.विठ्ठल -बिरदेव या देवाचं भक्त खेलोबा अंजन गावावरून चालत येत होता. दसरा झाल्यानंतर भोम पौर्णिमेला या देवाची यात्रा भरते. त्या यात्रेत हेडाम खेळायची ही जुन्या काळाची परंपरा,आजही त्याच जोशात आणि उत्साहामध्ये हि परंपरा चालू आहे. पट्टणकोडोली गावामध्ये श्री.विठ्ठल बिरुदेवाच्या समोर फरांडे बाबा हेडाम खेळतो. त्यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात.भंडा-याच्या उधळणीत,  ढोल-कैताळाच्या निनादात फरांडे  बाबा काचेचं पाणी दिलेलं जोड-हत्यार पोटावर मारून घेतो. पण वैशिष्ट्य असं कि, पोटावर हत्यार मारल्यानंतर साधा केसही तुटत नाही. हेडामसंस्कृतीचा महिमा खूप मोठा आहे._
धनगरी धर्मा मध्ये ही कला-परंपरा अगदी मोलाची आहे.ती अजूनही जपली जाते आणि इथून पुढेही जपली पाहिजे.


टिप:- हेडाम खेळाविषयी ज्यांना अधिक माहिती द्यावयाची असेल त्यांनी पर्सनल नंबर वरती द्यावी. पुढील भागात ती लिहली जाईल.
धन्यवाद...

Post a Comment

0 Comments