सोलापूर/प्रतिनिधी:
सोलापूरचे महाकाय उजनी धरण आता पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे. सोलापूरकरांचा विरोध डावलून या धरणाचे पाणी उचलून इंदापूर व बारामती तालुक्यास नेण्याची तयारी झाली आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने पुण्याचा बारामती तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या बांधावर पाण्याचा वाद रंगू लागला आहे. हा वाद चिघळू लागला असून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील पालकमत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.सोलापूरकरांचा हक्काचं पाणी कोणी पळवत असेल तर राज्यात आम्ही रान पेटवू असा इशारा दिला आहे.सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांसोबत आमदार प्रणिती शिंदे यांनी वाढीव टॅक्सवर बैठक घेतली.त्यांनतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.आणि पालकमंत्री दत्ता भरणे यांचा नाव न घेता त्यांवर निशाणा साधला आहे.
माढा तालुक्यातील उजनी धरण हे मुख्यत्वे सोलापूरच्या पाण्यासाठी निर्माण केले आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून इंदापूर आणि बारामतीसाठी हे पाणी नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. यातून हा वाद सुप्त स्वरुपात सुरूच होता. मात्र लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळताच हा वाद आता उघडपणे बाहेर येत सोलापूरकरांनी थेट इंदापूर, बारामतीकरां विरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.आज सोलापूर महानगरपालिकेत आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील उजनी पाण्याच्या प्रश्नावरून संताप व्यक्त केला आहे.
सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनीच उजनीचे पाणी इंदापूर व बारामतीला नेण्याच्या ३४८ कोटी रूपये खर्चाच्या लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळविली आहे.सोलापूरच्या हक्काचं पाणी जात असल्याने सोलापूरकरांसाठी पालकमंत्री भरणे हे खलनायक ठरू लागले आहेत. या प्रश्नावर सर्वपक्षीय नेते लोकप्रतिनिधी व नेते मंडळी एकवटून आंदोलन सुरू केले आहे.
0 Comments