तब्बल २१ वर्षांनी येतोय ट्विंकल खन्नाचा सिनेमा; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत



अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा आमिर खानसोबतचा मेला सिनेमा फ्ल़ॉप झाला अन् तिनं बॉलीवूडला रामराम ठोकत अक्षय कुमारशी लग्न करुन सेटल व्हायचा निर्णय घेतला. त्यानंतर तिनं आपल्यातील लेखिकेला वाव दिला आणि लिखाणाला सुरुवात केली. आज एक लेखिका म्हणून तिनं ओळखही निर्माण केली आहे. त्यामुळे नवा सिनेमा येतोय याविषयीची तिनं पोस्टच्या माध्यमातून घोषणा केली तेव्हा तिच्या चाहत्यांना वाटलं आपली लाडकी अभिनेत्री सिनेमात काम करताना दिसणार की काय. पण इथे थोडं सीक्रेट दडलं आहे.

अभिनेत्री ते लेखिका असा प्रवास केलेल्या ट्विंकल खन्नाचे सर्वात जास्त विकले गेलेले पुस्तक ‘द लीजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ च्या कथेवर सिनेमा बनविण्याची घोषणा केली गेली आहे. या सिनेमाची कहाणी पुस्तकातील शॉर्ट स्टोरी ‘सलाम नोनी अप्पा’ वर आधारित आहे. यासाठी अप्लॉज एंटरटेन्मेंटने एलिप्सिस एंटरटेनमेंट आणि मिसेस.फनीबोन्स मूव्हीजसोबत सिनेनिर्मितीची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पेलत सोनल डबराल बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

अप्लॉज एंटरटेनमेंटचे सीईओ समीर नायर यांनी सांगितलं आहे की, ”आम्ही ‘सलाम नोनी अप्पा’ या कथेवर सिनेमा बनविण्यासाठी उत्सुक आहोत. या सिनेमाच्या माध्यमातून सोनलचं पदार्पण आणि एलिप्सिसची सोबत आमच्यासाठी खूप खास आहे. सिनेमाला दिग्दर्शित करणाऱ्या सोनल डबरालनं ट्विंकलच्या या कथेला भावनापूर्ण, विनोदीशैलीची, चांगल्या दर्जाची कथा म्हणून संबोधलं आहे. ट्विंकलच्या व्यक्तिमत्त्वाची छाप या कथेमध्ये दिसून येते असंही ती म्हणाली.

सोनल पुढे म्हणाली,”दिग्दर्शिका म्हणून माझा प्रवास या सिनेमानं सुरु होत आहे याचा मला आनंद आहे. माझ्या दिग्दर्शकीय प्रवासासाठी यापेक्षा चांगली सुरुवात नसतीच कुठली. मी ट्विंकलच्या या कथेला सिनेमाच्या माध्यमातून लोकांना सांगण्यासाठी खूप उत्सुक आहे. ही कथा केवळ लोकांना प्रेरणा देणार नाही तर खूप आनंद देखील देऊन जाईल. सध्या सिनेमाच्या नावाविषयी आणि कलाकारांविषयी काही सांगितलं गेलेलं नाही. ट्विंकल खन्नानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

ट्विंकल खन्नानं आपल्या पोस्ट संदर्भात म्हटलं आहे की,सलाम नोनी अप्पा माझ्या दुसऱ्या पुस्तकातील कथा आहे. माझी आजी आणि तिची बहिण यांच्यातील नात्यावर आधारित ही कथा आहे. अप्लॉज एंटरटेन्मेंट आणि एलिप्सिस एंटरटेन्मेंट सोबत मिळून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Post a Comment

0 Comments