"शिक्षक व पदवीधर आमदार कसा असावा"


प्रा. डॉ. प्रभाकर तानाजी माने, प्रमुख अर्थशास्त्र विभाग जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर ता.शिरोळ जि. कोल्हापूर

भारतीय संविधानाला अनुसरून 'राज्य मुख्य निवडणूक अधिकारी' यांनी शिक्षक व  पदवीधर आमदार याकरिता निवडणूक कार्यक्रम व आचार संहिता जाहीर केली.त्यानुसार १ डिसेंबर ,२०२० रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर आमदारांच्या प्रत्येकी ६ जागेसाठी मतदान होत आहेत. मुळात शिक्षक व पदवीधारक हे या देशातील सर्वात महत्वाचा घटक असून  प्रामाणिक, सुशिक्षित, सामाजिक -सांस्कृतिक बांधिलकी जपणारा,जागरूक व अभ्यासू घटक आहे असे मानले जाते.त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेवर अशा हुशार ,सामाजिक  भान व जाण असणाऱ्या व्यक्तींना प्रतिनिधित्व मिळावे ही अपेक्षा असते.त्यासाठी दर पाच वर्षानी या निवडणुका होत असतात.
      
खरे म्हणजे या देशाचं भवितव्य लोकांनी लोकांच्यासाठी लोकाकरवी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे व्हावे हे अपेक्षित असते कारण त्यांनी सर्वसामान्य लोकांचे व या देशातील सर्व  सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक,राजकीय, भौगोलिक व आंतरराष्ट्रीय प्रश्न पूर्णपणे माहित असतात व प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील असतात असे मानले जाते. परंतु प्रत्यक्षात काय घडते किंवा त्याची वास्तविकता काय आहे याची जाणीव आपणास सर्वश्रुत आहे.त्याच पद्धतीने संविधानाला अनुसरून  लोकशाही पद्धतीने शिक्षक व पदवीधर आमदाराची निवडणूक होऊन त्यांची निवड व्हावी व त्यांच्याकडून या देशातील कर्मचारी, विविध स्वरूपाचे व सर्व पातळीवरील शैक्षणिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न व्हावा.परंतु या राज्यातील बोटावर मोजण्याइतपत प्रामाणिक, अभ्यासू व राजकारणविरहीत काम करणारे आमदार आहेत ज्यांच्यामुळे  त्या काळात आमदार पदाची, शिक्षक व पदवी धारकांची प्रतिष्ठा वाढली होती.

 परंतु काळाच्या ओघात अत्यंत स्वार्थी  राजकारण,बेगडी भावना व वाईट व्यवस्था निर्माण होत गेली.मग प्रश्न असा निर्माण होतो की,या राज्यातील इतर आमदारांना ज्या पद्धतीने विधानसभा व विधान परिषदेवर  ज्या पद्धतीने निवडून येतात व त्यांची कामाची पद्धत व जनतेविषयी असणारी बेगडी प्रेम,सत्ता लालसा  व पैसा सर्वश्रेष्ठ असे गृहीत धरून ते काम करीत राहतात. या सर्वांचा विचार करिता मग या भ्रष्ट व्यवस्थेविषयी पुन्हा विरोधी पक्ष व सामाजिक भान असणारे सामाजिक कार्यकर्ते , वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल न्यूज पोर्टल व सामाजिक घटकाकडून त्यांच्या कार्यपद्धती कशी चुकीची व ते कसे फसवतात याची पोल- खोल केली जाते.

 परंतु पुढच्या निवडणुकीपर्यंत उत्तम मंत्रिमंडळ, सुशासन व कर्तव्यदक्ष निर्भीड आमदार याची  वाट पाहावी लागते. अशाच प्रकारे ही व्यवस्था शिक्षक व पदवीधर आमदार यांच्यामध्ये थोड्या बहुत फरकाने दिसून येते.त्यामुळे या घटकाविषयी समाजात व पर्यायाने शिक्षक व पदवीधारक यांच्या मनात त्यांच्या विषयी आत्मीयता कमी होत चालली आहे.त्यामुळे शिक्षक व पदवीधारक व्यक्ती या निवडणुकीसाठी जाणीवपूर्वक मतदान नोंदणी न  करण्याचा प्रयत्न करतात तसेच मतदार नोंदणी असली तरी मतदार म्हणून ते मतदान करीत नाहीत याचे कारणमीमांसा वर उल्लेखित केल्या प्रमाणे आहे. त्याचबरोबर सर्व पक्षाचे किंबहुना आमदाराचे दिव्य स्वप्न बघणारे लोक किंवा उमेदवार ज्या पद्धतीने मतदान नोंदणीसाठी जागरूक असतात तसेच मतदान ही आपल्याच पारड्यात पडावं यासाठी ते प्रयत्नशील असतात त्याच पद्धतीने निवडणूक झाल्यानंतर किंवा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर हे लोक इतके सक्रिय, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, सामाजिक बांधिलकी जपणारा, शैक्षणिक प्रश्न मांडणारे दिसून येत नाही. हे मात्र सूर्यप्रकाशा सारखे  सत्य आहे.
    
मात्र निवडणुका झाल्यानंतर हे उमेदवार किंवा नवनिर्वाचित शिक्षक व पदवीधर आमदार हारतुरे स्वीकारणे, कौतुक करून घेणे, ठराविक कार्यकर्त्यांचे वाढदिवस जल्लोषात  साजरा करणे, कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावणे व सत्ताधारी पक्षाचे बड्या नेत्यांचे हुजरेगिरी करणे यापुरते त्यांचे कार्य मर्यादित राहते. त्याच्या पुढे जाऊन एखाद्या राजकीय सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधले जाऊन इतर सामान्य आमदार प्रमाणे त्यांची कार्यपद्धती  राहते. ते सांगतील त्याच  पद्धतीने त्यांच्या हो ला हो या पद्धतीने कामाची पद्धत राहते. मग आपल्या सारख्या शिक्षक व पदवीधारक मतदारांकडून खूप मोठ्या अपेक्षा धुळीस मिळतात व आपल्या सर्व अपेक्षा मातीमोल होतात. त्यामुळे या घटकाविषयी एक प्रकारचा प्रचंड राग व असंतोष मनात खदखदत असतो. उलटपक्षी शैक्षणिक प्रश्न मागे जाऊन त्या आमदार विषयी राग व चीड  मनात येते. पर्यायाने पुढच्या निवडणुकीत याला कसे पाडायचे व नव्या व्यक्तीला संधी कशी द्यायाची यासाठी ते प्रयत्नशील व जीवाचे  रान उठवीत असतात. पुन्हा नव्याने दुसरा एखादा व्यक्ती आमदार होतो व त्याची कामाची पद्धत ही मागच्या आमदारां सारखीच राहते त्यामुळे पुन्हा हे शैक्षणिक कामाचे न संपणारे दृष्टचक्र सुरू राहते त्यामुळे पुन्हा तीच मानसिकता निर्माण होते. पुढं काय? असा जेव्हा विचार करतो  तेव्हा पुन्हा यक्ष प्रश्नचिन्ह निर्माण होतो. म्हणजे 'ये रे माझ्या मागल्या' या म्हणी प्रमाणे ही व्यवस्था चालू राहते.  मग या व्यवस्थेचा व तथाकथित आमदारांचे व त्यांच्या कार्य पद्धतीचे करायचं काय? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
     
मग मनात प्रश्न निर्माण होतो की, आपला उमेदवार किंवा होणारा आमदार कसा असावा, त्याची शैक्षणिक वाटचाल, शैक्षणिक प्रश्नांची उत्तरे देणारा सर्व प्रकारच्या शैक्षणिक व शैक्षणिक चळवळी व मोर्चेमध्ये हिरीरीने सहभागी असणारा कधीही आपल्या कार्याची जाहिरात न करणारा, आपल्या मनाला भावणारा, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी व शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव असणारा व तेवढ्याच तळमळीने काम करणारा,शैक्षणिक कामाविषयी स्वतःला पूर्णपणे वाहून घेणारा, विविध मोर्चे आंदोलने यामध्ये हिरीरीने सहभागी व निर्भिडपणे नेतृत्व करणारा असावा, शैक्षणिक प्रश्न व चळवळ म्हणजे नेमकं काय याचं भान असणारा व चळवळीत प्रश्नांसाठी चांगल्या अर्थाने वळवळ करणारा, सामाजिक भान असणारा,स्वतःच्या ज्ञान व माहितीच्या आधारावर प्रश्न तडीस नेणारा असा लढाऊ शिक्षक व पदवीधारक आमदार असावा, ज्याच्या उक्तीत व कृतीत समानता आहे.जो विद्यार्थी,शिक्षक,पदवीधारक  व जनता यांच्यामध्ये लोकप्रिय असून समाज माध्यमांमध्ये चांगल्या कार्याच्या योगदानासाठी ज्याला महत्त्व दिले जाते, समतावादी विचाराने प्रेरित होऊन प्रचंड ऊर्जेने काम करणारी व्यक्ती असावी, भारतीय संविधानाला आपलं वैचारिक दैवत मानून सर्व महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन कोणतेही जात,धर्म,पंथ,लिंग त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व पदवीत्तर प्राध्यापक असा शैक्षणिक स्तराचा भेदभाव न करता सर्वांना एकसंघ बांधणारा व समानतेच्या न्यायाने काम करणारा, उमेदवार किंवा आमदार कोणत्या जिल्ह्यातून आहे याचा विचार न करता उमेदवाराचा शैक्षणिक ,सामाजिक, राजकीय व इतर सर्व प्रकारच्या कार्याचा वास्तव इतिहास पाहून त्याचा विचार व्हावा. उमेदवाराचा प्रचार करणारे  साथीदार व कार्यकर्त्यांकडून क्षणिक व तात्पुरत्या पद्धतीचे निवडणूक प्रचारकी बेगडी कामाचे कौतुक करणारे नसावे. तसेच काही उमेदवार स्वतः संस्थाचालक किंवा मोठ्या पदावर कार्यरत असून त्यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांचा गैरफायदा घेत असतील अशा लोकांना मतदान करणे हे संविधानाला व लोकशाहीला शोभणार नाही हे वेळीच संबंधित घटकांनी लक्षात घ्यावे.
       
सुरुवातीस काही व्यक्ति आपण अपक्ष उमेदवार असून मला मतदान केला तर कशा पद्धतीने कार्य करू याविषयी आदर्शवादी, अवास्तविक व तात्विक पद्धतीची भूमिका मांडली जाते त्या पद्धतीने प्रचारही केला जातो. हे उमेदवार निवडून आल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधून घेऊन आपण कसे  सत्तेमध्ये आहोत व आपल्या शिवाय काहीही चालत नाही अशा आविर्भावात हे तथाकथित आमदार वावरत असतात.

निवडणुकीच्या तोंडावर पाच वर्षात अंशतःकाही काम करून त्याचा प्रचंड मोठ्या पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर मार्केटिंग व गाजावाजा त्यांच्याकडून केले जाते. हे आमदार स्वार्थासाठी सत्तेत असणार्‍या पक्षांची राजकीय व गुप्त पद्धतीने लागेबांधे करून पुन्हा उमेदवारी घेण्याचा प्रयत्न केला जातो मग अशा उमेदवाराकडून अपेक्षा तरी काय असावी  हा प्रश्न निर्माण होतो व असे लोक  सत्तेशी जवळीकता साधून पैशाच्या आधारावर कार्यकर्त्यांची फौज निर्माण करून समाज माध्यमाच्या आधारावर आपल्या खोट्या केलेल्या कामाची जाहिरात केली जाते तसेच  राष्ट्रीय कार्यक्रम, राष्ट्रीय सण, समारंभ, वाढदिवसाचे निमित्त साधून खोट्या ,बेगडी प्रेमाच्या शुभेच्छा दिल्या जातात. संबंधित विद्यमान आमदार यांनी कोणत्या प्रकारचे शैक्षणिक प्रश्न मार्गी लावले याबाबत आपणही कधी निर्भीड व जबाबदारीने जाब विचारत नाही. त्यामुळे अशा कर्तव्यशुन्य  व्यक्तींचे निवडणुकीच्या निमित्ताने फावते अशा खोटारड्या लोकांचं करायचं काय? हा प्रश्न अनुत्तरीत न ठेवता 'हीच ती वेळ आहे'अशा फसव्या लोकांना त्यांच्या खोट्या कामाची खरी पोचपावती देण्याची आहे.

काही अपक्ष उमेदवार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे  पक्षांशी लागेबंध करून त्यांनी न केलेल्या खोट्या ,आभासी मार्केटिंगच्या मोहजाळात न फसता तसेच  फेसबुक, ट्विटर ,व्हॉट्स ॲप किंवा अन्य समाज माध्यमाच्या वापर करून केलेल्या फसव्या कामाच्या आधारावर मत मागण्याचा प्रयत्न करतील.त्याला आपण बळी न पडता त्या उमेदवाराच्या कार्याची वास्तविकता समजून घेऊन खरोखरच तो त्या पदाचा गरीमा राखणारा, चारित्र्यवान, वैचारिक प्रगल्भ, विश्वासू व कार्यदक्ष आमदार होऊन पदवीधारक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी व शिक्षक यांचे प्रश्न निर्भीड व ठोसपणे मांडणारा आहे असे वाटत असेल तर त्या उमेदवाराचा मतदानासाठी विचार व्हावा.
      
तसेच जुनी पेन्शन योजना लागू करणे, नवीन शैक्षणिक धोरणाविषयी ठोस मत, कायम विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा प्रश्‍न मार्गी ,सीएचबी प्राध्यापकांना न्याय देणारे, नोकरभर्ती बंदी उठवून कायमस्वरूपी पूर्णवेळ  पदाच्या जाहिराती काढण्यास प्रवृत्त करणारे, शाळाबाह्य कामे यास विरोध करणारा व शिक्षक वर्गाची प्रतिमा उच्च कोटीचा करणारा, सर्व शिक्षण उपसंचालक व संचालकांना शिक्षकांच्या प्रश्नाविषयी जाब विचारणारा, योग्य वेळेत सर्व शैक्षणिक  प्रशासकीय कामे  पूर्ण करून घेणारा, शैक्षणिक प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील असणारा, पदवीधारकांना बेकारी भत्ता मिळवून देणे, आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रवृत्त करणारे व आर्थिक सहकार्य करण्यास मदत करणारे असावा. यासाठी क्षणिक काळासाठी भावनिक न होता सद्सद्बुद्धीचा वापर करून योग्य ती पसंतीक्रम देऊन मुंबई विधान परिषदेवर हक्काचा आमदार व आपला माणूस म्हणून पाठवून द्यावे,ही विनंती.

Post a Comment

1 Comments