कोल्हापूर! प्रदूषण नियंत्रण मंडळाची राजारामवरील कारवाई म्हणजे 'चोर सोडून संन्याशाला फाशी'- दिलीप पाटील, चेअरमन

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास दि. 3 मार्च 2022 रोजी सायंकाळी 6.45 वाजता 48 तासांमध्ये उत्पादन थांबवण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले. पंचगंगा नदी प्रदूषणासंबंधी सदर कारवाई करत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. कारखान्याचा गळीत हंगाम संपूर्ण ऊसाचे गाळप झाल्याने कालच संपला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काहीही त्रास सहन करावा लागणार नाही. तरीपण पंचगंगा प्रदूषणासाठी राजाराम कारखान्याला जबाबदार धरणे म्हणजे 'चोर सोडून संन्याशाला फाशी' देण्याचा प्रकार असून ''आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी'' असल्याचे कारखान्याचे चेअरमन श्री.दिलीप पाटील यांनी सांगितले. तसेच त्यांनी संपूर्ण वस्तुस्थिती विषद करताना सांगितले की, मागील 8-10 दिवस पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मृत माश्यांचा खच नदीपात्रात दिसून आल्यानंतर सर्वच सन्माननीय वृत्तपत्रांनी यासंबंधी स्पष्ट भूमिका मांडत बातम्या प्रसिद्धीस दिल्या आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊन जनतेचा दबाव वाढू लागला.
          
जनतेचा वाढता प्रक्षोभ लक्षात घेता प्रदूषण नियंत्रण मंडळाला काहीतरी कारवाई करणे भाग होते. पण ज्या कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीतून सर्वात जास्त प्रदूषित पाणी व कचरा पंचगंगेमध्ये मिसळतो, त्या महापालिकेवर कारवाई करण्याच धाडस आणि इच्छाशक्ती सदर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तेव्हाही नव्हती आणि आजही नाही. महापालिकेवर सध्या प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असलेने त्यांचेवर कार्यवाही होऊ नये म्हणून राजारामवर सर्व खापर फोडण्याचा प्रयत्न प्रदुषण मंडळाला करावा लागलेला आहे. याचा विचार सुज्ञ नागरीक निश्चितपणे करतील.
            
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही प्रक्रिया युक्त पाणी पंचगंगेमध्ये सोडले जात नाही. कारण कारखान्याने 15 वर्षा पूर्वीच सांडपाण्यावर प्रक्रिया करून, ते पाणी थेट 13 कि.मी. लांबीच्या पाईपलाईनद्वारे नागाव ता.हातकणंगले येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिले आहेü. इतक्या मोठ्या पाईपलाईनमध्ये लहानसहान लिकेज होणं ही काही फारशी गंभीर बाब नाही. अश्याच पद्धतीने 17 जानेवारी रोजी एक एअर व्हॉल्व खराब झाल्यामुळे  लिकेज होत असल्याचे कारखान्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने कारखाण्याकडून पाणीपुरवठा रोखला गेला व 3 ते 4 तासांमध्ये सदर लिकेजची दुरुस्ती केली आहे.
           
या घटनेनंतर 4 वेळा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कारखाना कार्यक्षेत्रावर व इतर ठिकाणी पाहणी केली. या पाहणी अहवालामध्ये अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे नमुद केलेले आहे की, "राजाराम साखर कारखान्याकडून कोणत्याही प्रकारच्या प्रदुषण नियमांचे उल्लंघन होत नाही किंवा प्रक्रिया युक्त पाणी नदीला सोडले जात नाही आणि असे प्रक्रिया युक्त पाणी नदीमध्ये मिसळत असलेबाबत प्रदुषण मंडळाच्या कोणाही अधिकाऱ्यास आढळून आलेले नाही." त्यांच्या पाहणी अहवाला च्या प्रती कारखान्याकडे उपलब्ध आहेत. ही बाब लक्षात घेतलेस नदीमधील मेलेल्या माशांचा प्रश्न कारखान्याच्या प्रक्रिया युक्त पाण्याशी चुकीच्या पध्दतीने जोडून काही तरी उणीवा दर्शवून ही नोटीस दिलेली आहे. या सगळ्या घटनेनंतर मागील दीड महिन्यात प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत झालेला कारखान्याचा पत्रव्यवहार पाहिल्यानंतर आपल्याला सर्व सत्य परिस्थिती समजून येईल.
             
नदीपात्रापासून साधारण एक किलोमीटरवर झालेल्या केवळ काही तासांच्या एअर व्हॉल्व लिकेजमुळे पंचगंगेचे इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं म्हणणं, ही खरोखर हास्यास्पद बाब आहे. शिवाय ज्यांनी कारखान्याचे उत्पादन थांबवण्याचा आदेश दिला त्या रवींद्र आंधळे साहेबांनी काही दिवसांपूर्वी एका शिष्टमंडळाच्या भेटीवेळी महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मोठ्या प्रमाणात नदीप्रदूषण होत असल्याचे सविस्तरपणे कथन केले होते. ही बातमी वर्तमान पत्रातून व टी.व्ही. चॅनलव्दारे प्रसिध्दही झाली होती.
                
ज्या नदीच्या पाण्यावर कारखान्याच्या सभासदांचे जीवनमान व शेती अवलंबून आहे, त्या नदीचे  पाणी प्रदूषित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या वस्तुस्थितीचा बारकाईने अभ्यास करता, ही कारवाई केवळ कोणाला तरी वाचवण्यासाठी कोणचा तरी बळी देण्यासाठी केली असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या अनुषंगाने अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित असून यामागचं सत्य लवकरच  जनते समोर येईल.  
               
 प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर कारखान्याने याबाबत फेर पत्र व्यवहार केला आहे व प्रशासकीय पातळीवर या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी आमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. या प्रयत्नांना निश्चितपणे यश मिळेल याचा आम्हास विश्वास आहे.
               
आपण सगळेच जाणतो की, राजाराम कारखान्याला संघर्ष नवा नाही.. अश्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करीत राजाराम कारखान्याने सभासदांच्या पवित्र सहकार मंदिराचा दीप आजवर तेवत ठेवला आहे आणि ही उज्वल परंपरा इथून पुढेही कायम राहील. 

Post a Comment

0 Comments