बेकायदेशीर सोनोग्राफी केंद्रांवर कडक कारवाई करा - जाधव


सोलापूर  जिल्ह्यात ग्रामीण भागात 183 तर सोलापूर शहरात 181 नोंदणीकृत सोनोग्राफी सेंटर्स आहेत. या केंद्रांची तपासणी 20 जानेवारीपासून करण्यात येत आहे. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत तपासणी गुणवत्तापूर्ण करा. या केंद्रांसोबत बेकायदेशीरपणे प्रसूतीपूर्व सोनोग्राफी करून स्त्रीभ्रूण हत्या करीत असणाऱ्या नोंदणी नसलेल्या केंद्रावर कडक कारवाई करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केल्या. 

स्त्रीभ्रूण हत्येला प्रतिबंध घालण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवड प्रतिबंध) कायद्यांतर्गत (पीसीपीएनडीटी) दक्षता पथक समितीच्या बैठकीत श्री. जाधव बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, बार्शीच्या वैद्यकीय अधीक्षक श्रीमती डॉ. बोपलकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. 

जाधव यांनी सांगितले की, तपासणी पथकाने सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करताना ती सुयोग्य पद्धतीने करावी. सील केलेल्या केंद्रांवर लक्ष ठेवा. सोनोग्राफी केंद्रातून स्त्रीभ्रुण हत्येचे प्रकार आढळून आल्यास त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी कायदेशीर सल्लागार नेमा. सोनोग्राफी केंद्र प्रमुखांनी एफ फॉर्म तातडीने भरायला हवा. कोणत्या विषयावर तपासणी करावी. तपासणी झाली तर गुन्हे दाखल करून न्यायालयात केस टिकण्यासाठी पुरावे गोळा करा. यासाठी कार्यशाळा आयोजित करून सर्वांना माहिती देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

बेटी बचाओ अहवालानुसार जिल्ह्यात 0 ते 6 वर्षांचे लिंग गुणोत्तर 954 आहे. मुली वाचविण्यासाठी शासकीय यंत्रणांसोबत पालकांनीही प्रयत्न करावेत. यासाठी पालकांमध्ये जाणी जागृती आवश्यक आहे, असेही श्री. जाधव यांनी सांगितले. 

2007 पासून पीसीपीएनडीटीच्या 21 केसेस दाखल होत्या, यापैकी 10 केसेस न्यायालयात दाखल आहेत. आमची मुलगी या वेबसाईटवर आलेल्या तक्रारीचाही आढावा घेण्यात येत असल्याची माहिती डॉ. ढेले यांनी दिली.

Post a Comment

0 Comments