धक्कादायक! एका पोलिसाने दिली दुसऱ्या पोलिसाला मारण्याची सुपारी…


पोलिस उपनिरीक्षक  स्वप्नील बाळासाहेब लोहार यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिस कर्मचारी नितीन दुधाळ, योगेश प्रल्हाद अडसुळ (वय ३५, रा. एकता कॉलनी, हडपसर) यांच्यावर खुनाचा प्रयत्न व कट रचने या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी अडसुळ याला अटक करण्यात आली आहे. दुधाळ हा फरासखाना पोलिस ठाण्यात नेमणुकीला आहे. तर, अडसूळ हा सराईत असून त्याच्यावर खून व इतर असे सहा गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी दुधाळ व दत्तवाडी पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेले दिनेश दोरगे हे शेजारी-शेजारी राहत होते. त्यांच्यात पूर्वी किरकोळ वाद होते. त्या वादाच्या रागातून दुधाळ याने अडसुळला दोरगेंना मारण्याची सुपारी दिली. यासाठी दोघेही हडपसर परिसरात भेटले होते. त्यासाठी अगोदर दहा हजार रुपये देखील दुधाळ याने अडसुळला दिले होते. एखाद्या चोरीच्या दुचाकीने अपघात करून अपंगत्व आण. जीव गेला तरी बघून घेतो, असे दुधाळ याने अडसुळ याला सांगितले होते.

दोरगे हे दत्तवाडी पोलिस ठाण्यात नेमणुकीला आहेत. त्यामुळे त्याची सर्व माहिती काढण्याचे काम अडसूळ याने दत्तवाडी परिसरातील एका व्यक्तीला दिले होते. त्यानुसार ती व्यक्ती दोरगे हे कोणत्या रस्त्यानं जातात येतात याची माहिती काढत होते. त्यावेळीच दत्तवाडी पोलिसांना दोरगे याला मारण्याची सुपारी दिल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अडसुळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याने दुधाळ याने ही सुपारी दिल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक केली आहे. पोलिस कर्मचारी दुधाळ हा शुक्रवारी रात्री बंदोबस्तावर आलाच नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला जात आहे.

Post a Comment

0 Comments