‘परत सत्ता मिळेल हेही, तुम्ही डोक्यातून काढून टाका’; भाजपाचा अजित पवारांवर निशाणा


 
माझ्या एसटी कर्मचाऱ्यांनो, सरकारमध्ये विलीनीकरण होईल, हा मुद्दा डोक्यातून काढून टाका. सर्वच महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनी असा हट्ट धरला, तर तो पूर्ण करणे कोणत्याही सरकारला शक्य होणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत स्पष्ट केले.
 
एसटी महामंडळाचे कर्मचारी आपलेच आहेत. पण एका महामंडळाची मागणी मान्य केली, तर उद्या इतर महामंडळांतील कर्मचारी असाच हट्ट धरतील व तो मान्य करणे कोणत्याही सरकारला शक्य होणार नाही. हा विषय डोक्यातून काढा. मुंबईतील गिरणी कामगार संपासारखी स्थिती होऊ देऊ नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. अजित पवारांच्या या विधानानंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे. परत सत्ता मिळेल हेही, तुम्ही डोक्यातून काढून टाका, असं अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

दरम्यान, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना भरीव वेतनवाढ केली आहे. अन्य राज्यांच्या समकक्ष वेतन आणले आहे. त्यामुळे आता संप मागे घ्या. शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून, एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. आमदारांनी आपापल्या भागातील एस. टी. कर्मचाऱ्यांची समजूत काढून त्यांना कामावर परत येण्यासाठी विनंती करावी, असे आवाहन पवार यांनी विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना केले.

Post a Comment

0 Comments