उस्मानाबाद/प्रतिनिधी:
कळंब शहरातील दोन ठिकाणच्या रस्ता दुरूस्तीसाठी आणि एका ठिकाणी नालीचे बांधकाम करण्यासाठी नगर विकास विभागाने तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती उस्मानाबाद- कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे- पाटील यांनी दिली.
या कामांसाठी निधी मिळावा म्हणून शिवसेनेचे पालकमंत्री शंकरराव गडाख, आमदार प्रा. तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, कळंब शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांच्यासह नगर विकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्यातील नगरपालिकांना रस्ता व तद्अनुषंगिक बाबींचा विकास करण्यासाठी विशेष रस्ता अनुदान देण्यात येते. रस्ता अनुदान या योजनेअंतर्गत कळंब शहरातील दोन ठिकाणच्या रस्ता दुरूस्तीसाठी आणि एका ठिकाणी नाली बांधकामासाठी नगरविकास विभागाने तीन कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये कळंब शहरातील हावरगाव रोड ते आस्ताना आलिया दर्गापर्यंतच्या रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी दोन कोटी रुपये तर एकशे एक नगर, पुनर्वसन सावरगाव अंतर्गत रस्ता व नाली दुरूस्तीसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हावरगाव रोड ते आस्ताना आलिया दर्गापर्यंतच्या रस्त्याची व एकशे एक नगर, पुनर्वसन सावरगाव अंतर्गतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने आणि या भागातील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने तेथील नागरिकांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत होते. ही गैरसोय दूर करण्यासाठी रस्ता व नालीचे काम होणे गरजेचे होते. ही गरज ओळखून या कामांसाठी निधी मिळावा म्हणून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. कळंब शहरातील या कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार कैलास घाडगे- पाटील यांनी आभार मानले आहेत.
0 Comments