वैराग! आई वडील कामाला गेल्यावर आठ वर्षाचे बालक घरातून गायब


वैराग/प्रतिनिधी:

 वैराग येथे आई-वडिल कामास गेल्यानंतर घरी एकटाच असलेला आठ वर्षाचा शिवराज जोतीराम सुतार हा शनिवारी दुपारीपासून गायब झाला आहे. परिसरात, नातेवाईकांकडे शोध घेवूनही तो न सापडल्याने त्याच्या आईने वैराग पोलिस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली आहे. मूळचे मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील असलेले सुतार दांपत्य उदरनिर्वाहासाठी गेल्या काही वर्षापासून वैराग येथील जंगले गल्लीमध्ये भाड्याने राहत आहे. शिवराज हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. 

दिवसभर तो गल्लीतल्या मुलांसमवेत खेळत असे. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास मजुरीच्या कामानिमित्ताने ते दोघेही घराबाहेर पडले. त्यावेळी शिवराज घरातच होता. आई रुपाली दुपारी 4 च्या सुमारास कामावरुन परतल्यानंतर घराला कुलूप असल्याचे तिला दिसले. 

त्यानंतर त्यांनी आपल्या परिचित व इतर ठिकाणी त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. तो मित्रांसमवेत त्याच्या आजोळी वाळूज येथे जाण्यासाठी खाजगी वाहनाने गेला होता मात्र रस्त्यातूनच परतला. त्यानंतर त्याला गाव तळ्याकडे जाताना पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. तपासाधिकारी राजेंद्र राठोड हे बाहेरगावी असल्यामुळे तपास अजुन पुढे सरकलेला नाही.

Post a Comment

0 Comments