सत्ताधाऱ्यांच्या मूठभर नातेवाइकांना पैशांची उब : खासदार डॉ. अमोल कोल्हे



ज्या अर्थी धूर निघत आहे, त्याअर्थी कुठेतरी आग लागली आहे. ही आग पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचाराच्या रुपाने लागली आहे. या भ्रष्टाचारातून येणाऱ्या पैशांची उब सत्ताधाऱ्यांच्या मूठभर नातेवाइकांना मिळत आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या मुळाशी जावे लागेल. त्याचप्रमाणे या भ्रष्टाचाराविषयी बोलायला गेल्यावर महासभेत महापौरांनी सदस्यांना थांबविणे हा प्रकार गंभीर असल्याचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महापालिकेची ऑक्‍टोबर महिन्यांची महासभा गुरूवारी पार पडली. या सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. सात तास महासभेचे कामकाज पाहिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

 
यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले, सत्ताधारी भाजपच्या मदतीने स्मार्ट सिटीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार त्यांच्याच नगरसेविकेने उघडकीस आणला आहे. यामध्ये स्थापत्यच्या कामासाठी तांत्रिक मान्यता न घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर सर्व विरोधकांनी सभागृहामध्ये आवाज उठवला. मात्र विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीही आवाज उठविला. ज्याअर्थी सत्ताधारी नगरसेवक देखील सांगत आहे, त्याअर्थी ही भ्रष्टाचाराची आग लागलेली आहे.
 
महापालिकेतील सभाकामकाजाविषयी कोल्हे म्हणाले, सात तासांच्या कामकाजापैकी पाच तास विषयपत्रिकेवरचा विषय न घेणे गंभीर आहे. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांना काहीतरी लपवायचे आहे. मी सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलो होतो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना काहीतरी वेगळे वाटले असेल. परिणामी वेगळी चर्चा करत बसायचे मात्र, त्यांच्या मनात अतिथी तुम कब जाओगे असे होते. अर्थात हा सहनशक्‍ती तपासायचा प्रयत्न असेल. खूप काही झाकून ठेवायचे आणि आयुक्तांना टार्गेट करायचे अशी शंका येत असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

महासभेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी उपठेकेदाराविषयी रेकॉर्डिंग ऐकवण्याचे आव्हान दिले होते. मात्र, ते स्वीकारण्यास सत्ताधारी तयार नसावेत. त्यामुळेच महापौरांनी त्यांना बोलू न देता निलंबन करण्याचा इशारा दिला. खरे तर विषय कोणताही असला तरी महापौरांनी सदस्यांना बोलू दिले पाहिजे, असे डॉ. कोल्हे म्हणाले.

Post a Comment

0 Comments