गणेशोत्सवाची ठरली नियमावली! पुजेसाठी ५० जणांनाच परवानगीसोलापूर/प्रतिनिधी:

 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध आहेत, असे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले. पुजेसाठी ५० व्यक्‍तींनाच परवानगी असणार आहे. त्यांनी पुजेवेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली सात रस्ता येथील नियोजन भवनात बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार आदी उपस्थित होते. यावेळी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

पोलिस अधीक्षक सातपुते म्हणाल्या, कोरोनाची दुसरी लाट अजून पूर्णपणे ओसरलेली नाही. तिसऱ्या लाटेचीही शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून सर्वांनी काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना होणाऱ्या बाप्पाची मुर्ती चार फुटापर्यंत तर घरगुती बाप्पांची मुर्ती दोन फुटाची असावी. गणेशाच्या पुजेसाठी ५० व्यक्‍तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल. अनावश्‍यक खर्च टाळून मंडळांनी कोरोनाविषयक जनजागृतीवर भर द्यावा. रक्‍तदान शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर, सीईओ स्वामी यांनीही मार्गदर्शन केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर करवाई केली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments