नारायण राणे यांना मोठा दिलासा, न्यायदंडाधिकाऱ्यांकडून जामीन मंजूर...


रायगड :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी राणे यांनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता.

 तर मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं राणेंचा आजचा मुक्काम पोलीस ठाण्यात होणार का? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नारायण राणेंना अटक केल्यानंतर त्यांना दुपारी रत्नागिरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तिथून त्यांना महाड पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आलं. त्यानंतर राणेंना रात्री ८.३५ च्या सुमारास महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. राणे स्वत:च्या गाडीने आले होते. त्यांच्यासोबत नितेश राणे, प्रसाद लाड आणि प्रमोद जठारही होते. राणे पोहोचण्याची कुणकुण लागताच महाड पोलीस ठाण्याबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. यावेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments