पुण्यातील एका ५० वर्षीय महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्यानं सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता झिका व्हायरसचा फैलाव होऊ नये म्हणून पुण्यातील एका ग्रामपंचायचतीने एक निराळा प्रयोग केला आहे.
पुणे जिल्ह्यात असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिका व्हायरस रुग्ण आढळला होता. त्यानंतर बेलसर ग्रामपंचायतीने वैद्यकीय विभागाच्या सल्ल्यानुसार गावात चक्क कंडोम वाटण्याचा निर्णय घेतला आहे. पुरूषांच्या विर्यात झिका व्हायरस असल्यानं कमीत कमी महिलांनी ५ महिने गर्भधारणा टाळली पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय विभागानं दिला होता. त्यानंतर आता गावात कंडोम वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
पुरूषांच्या विर्यात कमीत कमी ४ महिने झिका व्हायरस राहू शकतो. त्यात शारिरीक संबंध ठेवले तर झिका व्हायरसची लागण होऊ शकते. पुढील ४ महिने गर्भधारणा टाळा आणि कंडोमचा वापर करा, असं गावकऱ्यांना सांगण्यात येत असल्याचं तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. उज्जवला जाधव यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, एडिस इजिप्त प्रकारचा डास चावल्यामुळे आणि शारिरीक संबंध ठेवल्यामुळे या दोन प्रकारातून झिका व्हायरचा संसर्ग होतो. बेलसर गावात सर्व महिलांच्या रक्ताची चाचणी करण्यात आली आहे.
0 Comments