काँग्रेस- राष्ट्रवादी मध्ये पुन्हा बिघाडीमहापालिकेच्यावतीने स्वातंत्र्यदिनी विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन घेण्यात आले. मात्र आपल्याला योग्य मानसन्मान मिळत नसल्याच्या निषेधार्थ मदन पाटील गटाने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला. त्यामुळे महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीची बिघाडी पुन्हा उफाळून आली. 

महापालिका क्षेत्रात साकारण्यात येत असलेल्या चिल्ड्रन्स पार्क, काळी खण सुशोभीकरण या कामाचे भूमिपूजन तसेच नूतनीकरण केलेल्या वि. स. खांडेकर वाचनालयाचे उद्घाटन याचे नियोजन सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले होते. मात्र या नियोजनात सत्तेत वाटेकरी असलेल्या काँग्रेसला सहभागी करून घेतले नसल्याचा आरोप होत आहे.

त्यामुळे काँग्रेसच्या मदन पाटील गटाने सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला. मदन पाटील गटाच्या नेत्या श्रीमती जयश्री पाटील, विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर यांच्यासह यांच्यासह कोणीही नगरसेवक या कार्यक्रमांकडे फिरकला नाही.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील आणि त्यांचे समर्थक उपमहापौर उमेश पाटील, नगरसेविका शुभांगी साळुंखे उपस्थित होते. काळी खण सुशोभीकरण कामाचा पाठपुरावा प्रभाग दहाच्या काँग्रेस नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी केला होता. परंतु त्यांनाही यात डावलण्यात आले.

या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाले. महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र काँग्रेसच्या नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही याबद्दल काँग्रेस नगरसेवकानी आपली खंत बोलून दाखवली होती.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते मंत्री विश्‍वजित कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही काँग्रेसच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या एकांगी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

Post a Comment

0 Comments