सोलापूर! प्रोत्साहनपर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहनसोलापूर/प्रतिनिधी:

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी प्रोत्साहनपर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एल.ए. क्षीरसागर यांनी केले आहे.

मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील विद्यार्थ्यांना महामंडळाकडून जेष्ठता व गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम तीन ते पाच विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ .बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे, बीग बजार समोर, सोलापूर येथे प्रत्यक्ष अथवा पोष्टाद्वारे अर्ज सादर करावेत, असे आवाहन श्री. क्षीरसागर यांनी केले आहे. अर्जासोबत अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अर्ज, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती, रेशनकार्ड जोडावे. मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

Post a Comment

0 Comments