महिलेने दिराच्या मदतीने दगडाने ठेचून केली पतीची हत्याएका महिलेने दिराच्या मदतीने दगडाने ठेचून पतीची हत्या  केली आहे. पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिरासह आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

अमोल शंकर रांजाळे असे खून झालेल्याचे नाव आहे. तर देविका अमोल रांजाळे आणि किरण शंकर रांजाळे असे अटक केलेल्या भावजय आणि दिराचे नाव आहे.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील जांभूळवाडी येथील रहिवासी असलेला किरण रांजाळे हा काही दिवसांपूर्वी आपली भावजय देविकाला घेऊन धानवली (ता. भोर) येथे आपल्या बहिणेकडे गेला होता. त्यानंतर रविवारी आरोपी पत्नी देविकाचा पती अमोलही त्याठिकाणी आला होता. दुपारी अडीचच्या सुमारास तिघेही बहिणीच्या घरातून बाहेर पडले. 

आपल्या घराकडे परतत असताना वाटते काही कारणावरून पती- पत्नीत वाद झाला. त्यामुळे आरोपी पत्नी देविकाने आपला दीर किरणच्या मदतीने दगडाने ठेचून पती अमोलची हत्या  केली. त्यानंतर आरोपीनी अमोलचा मृतदेह धानवलीच्या सोनजाई मंदिराजवळ फेकून दिला. गावकऱ्यांना हा मृतदेह दिसल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच भोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी दीर-भावजय यांना अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments