"जयसिंगपूर कॉलेजचे चालते-बोलते व्यक्तिमत्व जिनेन्द्र दत्तवाडे मामाच्या रूपातील पितृतुल्य मायेचे छत्र हरपलं"


अनेकांत एज्युकेशन सोसायटी,बारामतीचे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य व जयसिंगपूर कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सक्रिय व जेष्ठ सदस्य श्री जिनेन्द्र दत्तवाडे मामा यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७८व्या वर्षी कालवश झाले.खरं म्हणजे ही दुःखद वार्ता ऐकल्यानंतर माझ्यासह कॉलेजमधील प्रत्येक घटकाच्या पायाखालची जमीन सरकली आणि एकदमच मनाची अस्वस्थता वाढू लागली. मनात दत्तवाडे मामांच्या प्रेमापोटी सातत्याने वाटत होतं की,ही वार्ता खोटी असावी यासाठी संबंधित जवळच्या लोकांच्या कडून माहिती घेतली असता ही बातमी शतप्रतिशत खरी होती.
     
 त्यांच्या या दुःखद वार्ताने मनाची चलबिचल झालेली होती मात्र डोळ्यातून सातत्याने अश्रु वाहत होते.  ही घटना फक्त माझ्यापुरती मर्यादित नव्हती तर त्यांच्याशी सलगी ठेवणाऱ्या कॉलेजमधील प्रत्येक घटकांची झालेली होती कारण विद्यार्थी, शिपाई पासून संस्थेच्या प्रत्येक पदाधिकारी व सदस्यांना त्यांच्याविषयी आपुलकी, प्रेम व त्यांच्या शब्दाला महत्त्व होतं. कारण दत्तवाडे मामानी कॉलेज व्यवस्थापनात सहभाग घेतल्यापासून कधीही आपण या मोठ्या संस्थेचे एक सदस्य आहोत या अविर्भावात ते कधीही नव्हते कारण त्यांचा मूळचा स्वभाव हा संवेदनशील, मायाळू आणि विद्यार्थी, प्राध्यापक ,कर्मचारी प्रेमी व संस्थेच्या विकासाचा ध्यास डोळ्यासमोरून ते शेवटच्या क्षणापर्यंत संस्थेच्या व कॉलेजच्या विकासासाठी झटत राहिले. वयाच्या ७८ व्या वर्षी ही तरुणाईला लाजवेल असे उत्साही व्यक्तिमत्व दिसून येत होते.
       
दत्तवाडे मामांची आणि माझी ओळख तशी वृक्षप्रेमामुळे झाली होतो माझ्या घराच्या बागेतील विविध प्रकारची झाडे पाहून ते खूप खूश झाले होते. तेव्हापासून आमची ओळख एखाद्या तरुण मित्रासारखी व परिपक्व विचारांनी घट्ट होत गेली. कॉलेजमध्ये वनराई निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होतं, निसर्ग शेती याविषयी ते सातत्याने मला नवनवीन गोष्टी सांगत असत त्यासाठी ते प्रयत्नशील होते.
      
त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन अत्यंत साधा होता. जाती धर्मापेक्षा माणसाच्या कर्तुत्वाला त्यांनी आपल्या आयुष्यात महत्व दिले होते. तसेच खऱ्या अर्थाने जैन धर्माचं आचरण करणाऱ्या पैकी ते एक उत्तम व्यक्ती होती. त्यांचे कृत्रिम व बेगडी जीवनापेक्षा वास्तव व नैसर्गिक जगण्यामध्ये त्यांना खूप रस होता. त्यामुळे त्यांची साधी राहणी आणि उच्चकोटीचे विचारसरणी यामुळे ते सातत्याने कॉलेज मधील प्रत्येक घटकांशी त्यांचे ऋणानुबंध घट्ट होत गेले. कॉलेजचे विद्यार्थी कॉलेज कट्ट्यावर किंवा गर्दीने एकत्रित राहिल्यास तेथे जाऊन ते त्यांना सातत्याने करिअर घडविण्या संदर्भात नम्रपणे मार्गदर्शन करीत असत. कधीही कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता प्रत्येकाशी हक्काने व अधिकारवाणीने ते सर्वांशी संवाद साधत होते. आज ही कॉलेजमधील प्रत्येक घटकांना त्याच्या अचानक जाण्याचे शल्य सातत्याने मनाला बोचत आहे. आम्ही प्राध्यापक मित्र जेव्हा कधी एकमेकाशी एखाद्या विषयावर  बोलत असू त्यावेळी ते त्या ठिकाणी येऊन आमची परवानगी घेऊन ते बोलत असत हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि उत्तम संस्काराच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक वैशिष्ट्ये दिसून येत होते. मनुष्यजातीचा एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस समोर गोड बोलतो आणि पाठीमागे मात्र वाईट बोलत असतो मात्र याला दत्तवाडे मामा अपवाद होते. बऱ्याच वेळा  आमच्या सहकारी महिला प्राध्यापिका  सौ. सुपर्णा संसुद्धी ,डॉ.सौ सुनंदा शेळके व इतर महिला प्राध्यापिका दत्तवाडे मामांचा नेहमी सन्मान करीत त्यांच्याविषयी मनापासून कौतुकाचे चार शब्द त्यांच्या समोर व माघारी माझ्याबरोबर बोलत होत्या. दत्तवाडे मामांच्या माघारी सन्मान पूर्वक बोलणं हे त्यांच्या उत्तम व परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्टय होते हे यावरून कळून येते.
      
 कोरोना महामारीच्या काळात कालवश प्रा.आर.डी.धुमाळ यांच्या मृत्यूने ते खूप अस्वस्थ झाले होते. प्रत्येक व्यक्तीसमोर त्यांच्या गुणांचं कौतुक करीत. तसेच प्रत्येक प्राध्यापकांनी  संस्थेसाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत राहवे अशी त्यांची तळमळ होती. त्यांच्या प्रेरणेने व सल्ल्यानुसार राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मला सामाजिक कार्य करण्यास संधी मिळाली त्यापैकी कॉलेजमधील प्लास्टिक मुक्त परिसर व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यासाठी 'पर्सनल वे मशीन' च्या माध्यमातून केलेल्या कामाचे त्यांनी सन्माननीय संस्थेच्या अध्यक्ष व सर्व सदस्य समोर पोट भरून कौतुक केलं होतं त्यांच्या प्रेरणेने आम्ही खूप उपक्रम राबवू शकलो. त्यांच्या मनात कॉलेजच्या  चौफेर विकासासाठी जे काही करता येईल ते त्यांच्या वयानुसार करीत असत. गेल्या सात महिन्यांपासून कॉलेजमधील प्रत्येक उपक्रमांमध्ये संस्थेचे सदस्य म्हणून ते सातत्याने सहभागी झाले होते कुठेही त्यांनी खंड पाडला नाही तसेच अनेक कार्यक्रमाच्या वेळेस आयत्यावेळीचे प्रमुख पाहुणे म्हणून ते सदैव उपस्थित असत. मानापमान याच्यापलीकडे त्यांची विचारधारा होती.त्यांचे कॉलेजवरील  अतूट प्रेम पाहून संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.सुभाष अडदंडे यांनी कित्येक वेळा त्यांचे मनभरून कौतुक केले होतं. डॉ.अडदंडे सरांनी त्यांच्या वयाचा मान राखून कित्येक वेळा या कोरोना काळात न येण्याबद्दल त्यांना विनंती केली होती. पण दत्तवाडेमामा सातत्याने थोडा वेळ का होईना ते कॉलेजचे NAAC कामासाठी येत होते.  शेवटच्या दिवशी २२ एप्रिल २०२१ रोजी त्यांची शेवटची भेट झाली  होती ती भेट अखेरची असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हते. मात्र त्यादिवशी घरी जातेवेळी मला बाहेर  न फिरण्याबद्दल सल्ला दिला होता.
     
कोरोना महामारीच्या दुसऱ्या टप्प्यात कॉलेजसाठी त्यांनी दिलेले योगदान हे सातत्याने स्मरणात राहण्यासारखे आहे.त्यांची सामाजिक संवेदनशीलवृत्ती ही संस्थेला व कॉलेजच्या प्रत्येक घटकांना प्रेरणा देणारी राहील यात तिळमात्र शंका नाही. अशी  मायेची ऊब देणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या स्मृतींना जयसिंगपूर कॉलेज स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे,सचिव डॉ.महावीर अककोळे,खजिनदार मा.पद्माकर पाटील, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य,प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार, सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व अन्य सेवक यांच्या वतीने विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रा.डॉ. प्रभाकर तानाजी माने
प्रमुख,अर्थशास्त्र विभाग
जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर
ता.शिरोळ जि. कोल्हापूर

Post a Comment

1 Comments