केला चक्क लग्नातील आहेराचा व्यवसाय.. तब्ब्ल ३ वर्षानंतर अडकला पोलिसांच्या जाळ्यात!


पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा आता काही प्रमाणात कमी झाल्या असल्या, तरी पूर्णतः संपलेल्या नाहीत.. आजही बऱ्याच ठिकाणी या चालीरीती सुरूच आहेत.. त्यातूनच बरेचदा हुंडाबळीसारखे प्रकारही समोर येत असतात. मात्र, या अनिष्ट चालीरीतीच्या आडून एका ठगाने वेगळाच व्यवसाय मांडला होता.. मात्र, ‘कानून के हाथ बहुत लंबे होते है..’ हे तो विसरला आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला..

काही ठिकाणी आजही आहेराचा मानपान सुरू असल्याचे दिसते..आपली उपस्थिती दाखवण्यासाठी किंवा रिकाम्या हाताने मांडवातून बाहेर कसं पडावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे लग्नानंतर फुल ना फुलाची पाकळी देण्यासाठी अनेक जण आहेर कोण स्वीकारतेय, याचा शोध घेत मांडवभर फिरत असतात.. हीच गोष्ट एका भामट्याने हेरली…


असा करायचा लूट

कपाळी केशरी गंध.. डोक्यावर टोपी.. खांद्यावर टॉवेल असा खास पाहुण्यांच्या वेशभूषेत हा भामटा लग्नसोहळ्यात घुसायचा.. रुखवत मांडलेल्या ठिकाणी बाजूलाच खुर्ची टाकून बसायचा. समोर नवा स्टीलचा डबा, हातात वही नि पेन घेऊन आहेराची नोंदणी सुरू करायचा.. अंगावर चांगले कपडे.. दिसायला रुबाबदार असल्याने त्याचा कोणालाही संशयही येत नसे.. समोर येणाऱ्या पाहुण्यांना दोन्ही हात जोडून नमस्कार ठोकायचा. आहेर स्वीकारतोय, असे दाखवून द्यायचा.. आहेर देणाऱ्या पै-पाहुण्यांच्या नावांची नोंद वहीत करायचा. बारीकसारीक कामेही करू लागायचा.. नंतर सगळ्यांची नजर चुकवून हळूच तिथून पोबारा करायचा..

आहेराचे माध्यमातून रोज हजारो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या या भामट्याला ओतुर (पुणे) पोलिसांनी अखेर गजाआड केले. संदीप सगन धोत्रे, असे त्याचे नाव आहे. आहेराच्या पैशाचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत लालखन हिवरे येथील रुपाली चंद्रशेखर बेनके यांनी ओतुर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर हा प्रकार समोर आला..

अखेर भामटा पोलिसांच्या जाळ्यात

ओतूरजवळील एका मंगल कार्यालयात फिर्यादी बेनके यांच्या पुतणीचे लग्न झाले. नेहमीप्रमाणेच हा ‘बिन बुलाये मेहमान’ बनून गेला.. पण त्याचा बनाव अखेर समोर आला..सुमारे साडेआठ हजार रुपयांच्या आहेराचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी धोत्रे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. संबंधित आरोपीला पोलिसांनी ३० मार्च रोजी शुभश्री लॉन्स येथून ताब्यात घेतले आहे..

दरम्यान, पोलिस तपासात आरोपी धोत्रे याने अणे-माळशेज पट्ट्यातील अनेक मंगल कार्यालयांमध्ये अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे सांगितले. २०१८ सालापासून त्याच्या या लीला सुरू होत्या. मात्र, त्याची अखेर तुरुंगात झाली..

Post a Comment

0 Comments