शौमिका महाडिकांनी भरला ‘गोकुळ’साठी अर्ज, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पालकमंत्र्यांनी केलेल्या टीकेला दिले प्रत्युत्तर


कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक तथा गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शौमिका महाडिक यांच्या रुपाने महाडिक कुटुंबीयांतील पहिलीच व्यक्ती ‘गोकुळ’ची प्रत्यक्षरित्या निवडणूक लढवित आहे. ‘गोकुळ’मधील सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या त्या सून आहेत.
गोकुळची निवडणूक यंदा कमालीची चुरशीची ठरत आहे. विरोध राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने नेत्यांच्या वारसदारांना रिंगणात उतरविले आहे. 

त्यामुळे सत्ताधारी गटानेही गोकुळमधील सत्तारुढ गटाच्या नेत्यांच्या वारसदारांना रिंगणात उतरावे अशी दूध उत्पादकांची भूमिका होती. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या नेत्यांनीही यंदा वारसदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. गोकुळमध्ये जवळपास चार दशके माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील हे नेतृत्व करत आहेत. माजी चेअरमन अरुण नरके त्यांच्या सोबत आहेत. माजी चेअरमन रणजितसिंह पाटील, विद्यमान चेअरमन रवींद्र आपटे यांच्यासह अन्य संचालकांची त्यांना साथ आहे. माजी चेअरमन अरुण नरके यांचे चिरंजीव चेतन नरके यंदा गोकुळची निवडणूक लढवित आहेत. नरके यांच्या पाठोपाठ महाडिक कुटुंबीयांतील पुढची पिढी गोकुळसाठी प्रत्यक्षरित्या सक्रिय होत आहे.

सत्तेच्या स्वप्नांनी पालकमंत्री अस्वस्थ, त्यांनाच रात्रीची झोप लागेना

पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर टीका करताना त्यांची दुपारची झोप उडाली असा टोला लगावला होता. त्या टीकेला शौमिका महाडिक यांनी प्रतिउत्तर दिले. महाडिक म्हणाल्या, ‘दहा वर्षापूर्वी पालकमंत्री सतेज पाटील हे माजी महादेवराव महाडिक यांच्यासोबत काम करत होते. दहा वर्षाचा गॅप पडला आहे. त्यामुळे त्यांना माहिती नाही. गेली चाळीस वर्षे सभासदांच्या विश्वासावर व त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळची प्रगती वाखाणण्याजोगी झाली आहे. मात्र पालकमंत्री गोकुळमधील सत्तेच्या स्वप्नाने अस्वस्थ आहेत. त्यांनाच रात्रीची झोप लागेना, त्यांची रात्रीची झोप उडाली आहे. ’

Post a Comment

0 Comments