वैराग! शासकीय जमिनीतील मुरूम चोरी प्रकरणात न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश


वैराग/प्रतिनिधी:

शासकीय जमिनीतुन आणि ओढे, नदी-नाले येथुन गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन होते, म्हणजेच रॉयल्टी न भरता दगड, माती, वाळू व मुरूम यांची चोरी केली जाते. असाच मुरूम चोरीचा प्रकार वैराग भागातील जवळगाव नं २ येथे घडले बाबत श्री. विष्णु बाबासाहेब कापसे यांनी गावकामगार तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, तसेच वैराग पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक, गौण खनिज अधिकारी, जिल्हाधिकारी सोलापुर यांचेकडे लेखी तक्रार केली. यापैकी कोणीही दखल न घेतलेने बार्शी येथील न्यायालयात धाव घेतली असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एन. एस. सबनीस यांनी आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल करुन तपास करणेचे आदेश वैराग पोलिसांना दिले आहेत.

 यातील आरोपींनी दिनांक १५.११.२०२० ते ३०.११.२०२० पर्यंत मौजे जवळगाव नं २ मधील शासकीय मालकिचे गायरान जमीन गट नं १९४/१ मधील गायरान जमीन खोदून त्यातील सुमारे एक हजार ट्रॅक्टर ट्रॉली भरून अंदाजे १२०० ते १३०० ब्रास मुरूम विना नंबरच्या जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने जवळगाव नं २ ते हत्तीज शिवरस्त्यावर बेकायदेशीरपणे व शासकीय परवानगीशिवाय आरोपींनी त्यांचे स्वतःच्या शेतात खाजगी रास्ता तयार करण्यासाठी टाकला आहे, सदर बेकायदा मुरूम वाहतुकीसाठी आरोपींनी हेतुपुरस्सर विनानंबरचे ट्रॅक्टर ट्रॉली व जेसीबी चा वापर केला आहे. याची तक्रार गावकामगार तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, तसेच वैराग पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, गौण खनिज अधिकारी सोलापुर, जिल्हाधिकारी सोलापुर यांना दिली होती परंतु, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.

 याबाबत मे. न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) नुसार अर्ज दाखल केला असता मे. न्यायालयाने फिर्यादिचे वकील यांचे म्हणणे ऐकून आरोपी नामे १) परमेश्वर आंबरुषी ढेंगळे २) अर्जुन बापू ढेंगळे ३) समाधान रावसाहेब ढेंगळे ४) रावसाहेब मच्छिंद्र ढेंगळे सर्व राहणार जवळगाव नं २ ता. बार्शी, जि. सोलापूर यांचे विरुध्द भा. द. वि. कलम ३७९, ४५2, ३४ गौण खनिज अधिनियम १९५७ चे कलम ४, २१, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ व प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्टचे कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश वैराग पोलिसांना दिले आहेत. यात फिर्यादी मार्फत ॲड. प्रशांत एडके, ॲड. सुहास कांबळे, ॲड. समाधान सुरवसे व ॲड. सर्फराज इनामदार, यांनी काम पाहिले.
 

Post a Comment

0 Comments