"NAAC कडून शिवाजी विद्यापीठाला प्राप्त झाले A++ मानांकन ; देशभर फडकला शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पताका"

प्रा.डॉ.प्रभाकर माने/ शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

‘नॅक’ (बंगळुरू)च्या चौथ्या पुनर्मूल्यांकनामध्ये येथील शिवाजी विद्यापीठाने ३.५२ सीजीपीए गुणांकनासह ‘अ++’ मानांकन प्राप्त करून सुवर्णाक्षरांत नोंदवावी अशी कामगिरी केली आहे अशी माहिती कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
      
सुरवातीस नॅक’ची बातमी कळताच कुलगुरू डॉ. शिर्के व त्यांची संपूर्ण टीमने महाराजांना मनोभावे अभिवादन केले.त्यानंतर डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅकच्या चौथ्या पुनर्मूल्यांकन फेरीअंतर्गत नॅक पिअर टीमने १५ ते १७ मार्च २०२१ या कालावधीत शिवाजी विद्यापीठास भेट दिली. नॅकच्या बदललेल्या नव्या निकषांतर्गत गुणांकन करण्यात आलेले शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील दुसरे विद्यापीठ आहे. यामध्ये विद्यापीठाने नॅकला सादर केलेल्या स्वयं मूल्यनिर्धारण अहवालाचे (एसएसआर) सात निकषांवर सुमारे ७०० गुणांचे मूल्यांकन केले जाते. उर्वरित ३०० गुणांचे मूल्यांकन पिअर टीममार्फत करण्यात येते. सात निकषांमध्ये अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन प्रणाली, संशोधन, नवनिर्मिती व विस्तार, पायाभूत सुविधा व अध्ययन स्रोत, विद्यार्थी सहाय्यता व प्रगती, प्रशासन, नेतृत्व व व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्ये आणि उत्तम व वेगळे उपक्रम यांचा समावेश असतो. यामध्ये अभ्यासक्रम, विद्यार्थी सहाय्यता व प्रगती आणि उत्तम उपक्रम यामध्ये शिवाजी विद्यापीठाने चमकदार कामगिरी केली आहे. प्रशासनाच्या संदर्भात तर शिवाजी विद्यापीठाची एक स्वतःची अशी परंपरा आहे. 
      
 प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवारांपासून सर्वच कुलगुरूंनी त्याकामी योगदान दिलेले आहे. विशेषतः डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या काळात नॅक सुरू झाले, तेव्हा त्यांनी या अनुषंगाने उपयुक्त अशी पायाभरणी करण्याचे काम केले. त्यामुळे अवघ्या चारच फेऱ्यांत शिवाजी विद्यापीठाने ‘अ’पासून ते ‘अ++’पर्यंतचा प्रवास केला आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही निकषांवर विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विशेषतः नॅक पिअर टीमने त्यांच्या एक्झिट मिटींगमध्ये शिवाजी विद्यापीठामधील एकजुटीने आणि एकदिलाने काम करण्याच्या प्रवृत्तीचे खुल्या मनाने कौतुक केले, असे त्यांनी सांगितले.
        
 कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, नॅकचे अ++ मानांकन प्राप्त झाल्यामुळे आपले संशोधक, विद्यार्थी, शिक्षक यांना अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होणार आहेत. संलग्नित महाविद्यालयांना सुद्धा त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे विद्यापीठ परिक्षेत्रातच नव्हे, तर देशभरातील विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. काम करणाऱ्या सर्वांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे. मिळालेले यश टिकविणे आणि वृद्धिंगत करणे ही आता आमची जबाबदारी आहे, याची जाणीव आम्हाला आहे. विद्यापीठाच्या या यशामध्ये आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, सर्व अधिकार मंडळांचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी व सेवक, संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठावर प्रेम करणारे समाजातील सर्व स्तरांतील घटक या सर्वांचा बहुमोल स्वरुपाचा वाटा आहे. यापुढील काळातही सर्वांकडून असेच सहकार्य लाभत राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
     
  यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, आयक्यूएसीचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख उपस्थित होते. प्रा. आर.के. कामत यांनी नॅकच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी आभार मानले.
      
दुपारी विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वोत्तम गुण प्राप्त झाल्याची बातमी कळताच ती वार्‍यासारखी पसरली आणि  देश-विदेशातून विद्यापीठाच्या कौतुकाचा आनंदोत्सव साजरा झाला.तर स्थानिक पातळीवर महोत्सव सुरू झाल्यासारखे वातावरण उत्साहपूर्ण व आनंदमय झाले होते. परंतु कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांच्या मनाचा मोठेपणा इतका आहे की,त्यांनी कोविड १९  महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन फोनद्वारे शुभेच्छा  देण्याबाबत मनापासून आवाहन केले.

Post a Comment

0 Comments