जळगावात शिवसेनेला पाठिंबा देणारे MIM चे तीन नगरसेवक निलंबित


जळगाव महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बहुमतात असलेल्या भाजपला धक्का देत दोन्ही पदं मिळवली. या खेळीमध्ये शिवसेनेला भाजपच्या २७ नगरसेवकांसह MIM च्या ३ नगरसेवकांनीही साथ दिली होती. पण आता या ३ नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाहाद्दूल मुसलमीन म्हणजेच MIMच्या तिन्ही नगरसेवकांना पक्षाने निलंबित केले आहे.

रियाज अहमद बागवान,सईदा युसूफ शेख,सुन्नबी राजू देशमुख अशी या तीन नगरसेवकांची नावे आहेत. MIMचे जिल्हाध्यक्ष जिया अहमद बागवान यांचा रियाज हे भाऊ आहेत. या तिघांना शिवसेना उमेदवाराला मतदान केल्याने त्यांना नोटीस बजावून २१ मार्चपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची वेळ देण्यात आली आहे. 

या तीन नगरसेवकांनी शिवसेनेला मदत केल्याने पक्षाच्या प्रतिमेला आणि ध्येयधोरणांना धक्का बसल्याचे एमआयएमचे म्हणणे आहे. या तिन्ही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द केल्याची माहिती एमआयएमचे प्रदेश कार्याध्येक्ष डॉ. गफ्फार कादरी यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Post a Comment

0 Comments