गेली ४० वर्षे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये २०० हून अधिक चित्रपटामध्ये खलनायकापर्यंतची भुमिका करणारे विलास रकटे अर्थात बापू यांच्याशी गेल्या १५ वर्षापासूनचा माझा कौटुंबिक संबंध. बापूंनी चित्रपट सृष्टीमध्ये काम करत असताना स्वत:चा एक स्वाभिमान जपला. या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक कलाकारही घडविले समाजातील स्वातंत्र्यसैनिकांचे , क्रांतिकारकांचे , शोषितांचे , वंचितांचे व दिनदुबळ्याचे जीवन चित्रपटाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत आले. चित्रपट सृष्टीत काम करत असताना यशवंतराव चव्हाणांपासून ते अगदी आज अखेर त्यांनी अनेक राजकीय क्षेत्रामध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करून स्वत:चा स्वाभिमान जपत संघर्षाशी दोन हात केले. आज काल एखाद्या नाटकामध्ये किंवा गाण्यामध्ये प्रसिध्दीस आलेल्या कलाकारास इतके ग्लॅमर निर्माण होते की त्याची लाइफस्टाईल बदलून जाते. पण रकटे बापू ४० वर्षापुर्वी जे होते तशीच परिस्थिती आजही आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मला बापूंचा फोन आला “ शेटटीसाहेब माझा डावा गुडघा खूपच दुखू लागला असून वेदना असह्य झाल्या आहेत गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे पण शस्त्रक्रिया करण्यासारखी माझी आर्थिक परिस्थिती नाही काय कराव काय सुचना”. बापूंची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे हे माहिती असल्याने गेल्या १५ वर्षाच्या सहवासातून मी बापूंच्या कुटूंबाचाच एक भाग बनल्यामुळे बापूंनी माझ्याकडे त्याच हक्काने आपल्या वेदना मांडल्या.मी बापूंना पटकन बोललो “ बापू चिंता करू नका दोनच दिवसात आपल्या गुडघ्याची शस्त्रक्रिया आपण सुसज्ज हाॅस्पीटलमध्ये करूया”.
बापूंचा फोन झाल्यानंतर लगेचच मी शिवराष्ट्र हायकर्स ग्रुपचे प्रमुख माझे मित्र प्रशांत साळुंखे यांना फोनवरून शस्रक्रियेच्या आर्थिक मदतीसंदर्भात चर्चा केली. प्रशांत यांनी क्षणाचाही विलंब न करता नाॅर्थ स्टार हाॅस्पीटल कोल्हापूरचे डाॅ. किरण जोशी यांच्याशी संपर्क साधून शस्त्रक्रिया करण्याबाबत चर्चा केली व दुस-याच दिवशी डाॅक्टरांनी बापूंच्या सर्व तपासण्या करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
या शस्त्रक्रियेसाठी जवळपास १ लाख ७० हजार रूपयाचा खर्च होता. डाॅक्टर किरण दोशी यांनी फक्त उपकरणांचा व औषधांचे पैसे वगळता इतर सर्व खर्च कमी करून १ लाख १० हजार रूपयांत शस्त्रक्रिया केली. यासाठी प्रशांत साळुंखे यांनी शिवराष्ट्र हायकर्सकडून ५५ हजार रूपये, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचेकडून २५ हजार रूपये , इस्लामपूरचे उद्योजक सर्जेराव यादव यांचेकडून १० हजार रूपये , बापूसाहेब कारंडे यांचेकडून २० हजार रूपयाचा निधी संकलित करून रकटे बापूंची शस्रक्रिया यशस्वी पार पाडली.
जवळपास २०० चित्रपटात काम करून मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देणारे व चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छबी निर्माण करणारे बापू व त्यांच कुटूंब मात्र आर्थिक गोष्टीबाबत उपेक्षितच राहिले आहे. अशा या बापूंच्या पायाची शस्त्रक्रिया वरील सर्व लोकांच्या मदतीने करून त्यांना या वयातही उभारी देता आले हेच माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यासाठी मोठी समाधानाची गोष्ट आहे.
0 Comments