अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी आणखी दोन याचिका


 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या आणि एकूणच संपूर्ण घटनाक्रमाच्या चौकशीच्या मागणीसाठी आणखी दोन जनहित याचिका मे.उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.
 
परमबीर यांनीही अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या आणि त्यांच्या कारभाराच्या सी.बी.आय. चौकशीच्या मागणीसाठी  फौजदारी जनहित याचिका केली होती. 
 अॅड. घन:श्याम उपाध्याय आणि पुणेस्थित सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी या याचिका दाखल केल्या आहेत. 

अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला या दोघांनी आपल्या याचिकेत दिला आहे. अॅड.उपाध्याय यांनी आपल्या याचिकेत परमबीर यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सखोल चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली आहे. 

पोलीस आणि राजकीय नेत्यांंकडून खंडणी मागितली जात असल्याच्या आरोपांची, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके  ठेवण्यापासून ते परमबीर यांनी देशमुख यांच्यावर आरोप करण्यापर्यंतच्या सगळ्या घटनाक्र माची सी.बी.आय. वा स्वतंत्र तपास यंत्रणेतर्फे चौकशी करावी, अशीही मागणी केली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केलेल्या कथित गुन्ह्याकडे डोळेझाक केल्याप्रकरणी अनिल देशमुख, परमबीर यांच्यावर कारवाईच्या आदेशाची मागणी पाटील यांनी याचिके द्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments